वैभव कळस
म्हसळा : कोकण उन्नती मित्र मंडळाचे वसंतराव नाईक कला, वाणिज्य आणि बॅरिस्टर ए. आर. अंतुले विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय ग्रंथपाल दिवस तसेच भारतीय ग्रंथालयशात्राचे जनक व प्रणेते डाॅ. शियाली रामामृता रंगनाथन यांची जयंती मोठ्या दिमाखात साजरी करण्यात आली. महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभाग आणि स्पर्धा परीक्षा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात म्हसळा शहरातील सार्वजनिक ग्रंथालयात दीर्घ काळ सेवा करून निवृत्त झालेल्या श्रीमती सुहासिनी दातार व श्रीमती अरूणा करडे या दोघी ग्रंथपालांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डी. ए. टेकळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सर्व प्रथम डाॅ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. आर. एस. माशाळे यांनी रंगनाथन यांच्या जीवनावर प्रकाश टाकताना म्हणाले, आधुनिक भारतातील ग्रंथालयशास्त्राच्या इतिहासात रंगनाथन हे नाव सुवर्ण अक्षराने लिहिले गेले आहे. रंगनाथन यांनी आपल्या कारकीर्दीची सुरूवात मद्रास विद्यापीठाचे पहिले ग्रंथपाल म्हणून केली. पुढे विद्यापीठाद्वारे ग्रंथालयशात्राचा शास्त्र शुद्ध अध्ययन करण्यासाठी लंडनला जाण्याची संधी मिळाली. त्या संधीचा त्यांनी भारतीय ग्रंथालयशात्राला साजेशी द्विबींदू वर्गीकरण पद्धतीचा नवीन सिद्धान्त जगासमोर ठेवून नवा आदर्श मांडला. रंगनाथन यांच्या संपूर्ण कारकिर्दीला रंगनाथन युग म्हणून संबोधले जाते.
सुहासिनी दातार व अरूणा करडे यांनी आपल्या मनोगतात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाचे सभासदत्व स्वीकारून वाचनाचा आनंद घ्यावा असे आवाहन केले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्र. प्राचार्य डी. ए. टेकळे यांनी ग्रंथालये ही युवकांची ज्ञान संवर्धन करणारी संस्था असून रंगनाथन यांची ग्रंथालयशास्त्राच्या पाच सूत्रावर प्रकाश टाकला. याप्रसंगी इतिहास विभाग प्रमुख डाॅ. एस. यू. बेंद्रे व हिंदी विभाग प्रमुख डाॅ. एम. एच. सिद्दीकी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला स्पर्धा परीक्षा विभागाचे प्रमुख प्रा. एस. सी. समेळ व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता डाॅ. जगदीश शिगवण यांनी उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त करून केली.