किरण लाड
नागोठणे : ‘झुकती है दुनिया झुकानेवाला चाहीए’, याप्रमाणे सध्याच्या दुनियेत फसणारे हजारो जण भेटतात. समोरच्या व्यक्तीने दाखवलेल्या अमिषाला बळी पडून लाखो रुपयांची फसवणूक करून घेतात. बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून एखादा भामटा याच गोष्टीचा फायदा घेत गोड बोलून या सुशिक्षित तरुणांच्या मजबुरीचा फायदा उचलत त्यांची लाखो रुपयांची फसवणूक केली जाते. नागोठणे पोलीस स्टेशन हद्दीत असाच फसवणुकीचा प्रकार घडला आहे.
संजय गुलाम राठोड (वय 45 रा. बोरगाव, ता. घनसावंगी, जि.जालना) व संजय लिबांजी निलखन (वय 50 रा. हिवरा, रोशनगाव, जि. जालना) यांनी फिर्यादी साईनाथ धुळे यांना आमची रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांच्याशी ओळख असून तरुण मुलांना नोकरीला लावू असा विश्वास दिला. धुळे यांनी काही सुशिक्षित बेरोजगार तरुणांना याबाबत माहिती दिली आणि दहा तरुणांकडून २३ लाख रुपये घेऊन ते आरोपी यांना दिले. काही दिवसांनी या तरुणांना रेल्वेचे बनावट जॉइनिंग लेटर देवून त्यांची फसवणूक केली. हा फसवणूकीचा गुन्हा जानेवारी २०२१ ते सप्टेंबर २०२१ या कालावधीत घडला आहे. याप्रकरणी फिर्यादी साईनाथ धुळे यांनी दि. १ ऑगस्ट २०२३ रोजी नागोठणे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. सदर गुन्हयाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी, रोहा सोनाली कदम व सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पी. जी. पाटील करीत आहेत.
सदर गुन्ह्यातील एका आरोपीला पोलिसांनी २ ऑगस्ट रोजी पनवेल येथून अटक केली. या आरोपीला कोर्टात हजर केले असता त्याला ७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. या आरोपीची ९ ऑगस्ट रोजी जामिनावर सुटका झाली. सुशिक्षित बेरोजगार तरुणांना हेरून त्यांच्या मजबुरीचा फायदा उचलून त्यांची फसवणूक करणारे असे अनेक भामटे राजरोसपणे असे गुन्हे करत असल्याच्या घटना समोर येत आहेत. तरुणांची फसवणूक करणाऱ्या या भामट्यांचा पोलिसांनी शोध घेऊन त्यांना कठोरात कठोर शिक्षा करावी अशी मागणी तरुण वर्गाकडून केली जात आहे.