• Fri. Mar 13th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

ऐन गणेशोत्सवात एसटी बस रस्त्यातच बंद; प्रवाशांचा खोळंबा

ByEditor

Aug 25, 2025

नादुरुस्त एसटी बसेसचा मुद्दा ऐरणीवर

प्रतिनिधी
नागोठणे : गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आला असून मुंबईसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून कोकणवासीय मोठ्या संख्येने गावी रवाना होत आहेत. रेल्वे, खासगी गाड्या, तसेच राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसेसद्वारे मोठ्या प्रमाणावर प्रवास सुरू आहे. मात्र, ऐन गर्दीच्या काळात एसटीच्या नादुरुस्त बसेसनी कोकणकरांना अक्षरशः रस्त्यात डांबून ठेवले आहे.

मुंबई–गोवा महामार्गावर तसेच राज्यातील इतर महत्त्वाच्या मार्गांवर गेल्या दोन दिवसांत अनेक एसटी बसेस वाटेतच बंद पडल्या. या बस रस्त्याच्या कडेला उभ्या राहिल्यामुळे प्रवाशांचा खोळंबा तर होतोच आहे, शिवाय मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते. विशेषतः महामार्गावर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्याने प्रवाशांना तासन्तास प्रवासात अडकून राहावे लागत आहे.

AI Image

प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, काही बसेसना इंजिनची समस्या, काहींची ब्रेकडाऊन, तर काहींमध्ये इतर तांत्रिक अडचणी उद्भवतात. मात्र, अशा प्रसंगी एसटी महामंडळाकडून तात्काळ पर्यायी बस उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. परिणामी महिला, लहान मुले, वृद्ध आणि गणेशभक्त प्रवासादरम्यान प्रचंड त्रास सहन करत आहेत.

गणेशोत्सव हा कोकणकरांसाठी सर्वात मोठा सण असल्याने प्रत्येक वर्षी या काळात वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण येतो. एसटी महामंडळाने यंदा विशेष गाड्या सोडण्याची घोषणा केली असली तरी, प्रत्यक्षात नादुरुस्त बसेस आणि देखभाल अभावाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यामुळे एसटीच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

प्रवाशांचा आरोप आहे की, “गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी महामंडळाने अतिरिक्त बसेस उपलब्ध करून दिल्या, पण त्या योग्य तांत्रिक तपासणीशिवाय रस्त्यावर सोडल्या गेल्या. त्यामुळे प्रवास सुखकर होण्याऐवजी त्रासदायक ठरत आहे.”

वाहतूक पोलिसांना मात्र अशा नादुरुस्त बसांमुळे महामार्गावर तासन्तास कोंडी हटविण्यासाठी तगडा पिंड करावा लागत आहे.

राज्य परिवहन विभागाने या परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देत एसटीच्या दुरुस्ती व पर्यायी बससेवेबाबत तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी गणेशभक्त आणि प्रवासी संघटनांकडून होत आहे. अन्यथा, पुढील काही दिवसांत प्रवासाचा हा त्रास आणखी गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

“प्रत्येक वर्षी हाच प्रकार घडतो. बस बंद पडली की आम्हालाच त्रास होतो. अतिरिक्त बसेस सोडल्या, पण त्या नादुरुस्त असतील तर उपयोग काय?”
-मनीषा जाधव, प्रवाशी

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!