• Mon. Jan 26th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश

ByEditor

Aug 25, 2025

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (मनसे) मोठी हालचाल घडली आहे. पक्षाचे राज्य सरचिटणीस आणि कोकणातील महत्त्वाचे संघटक वैभव खेडेकर यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या भाजप किंवा शिवसेना (शिंदे गटात) प्रवेशाबाबत चर्चांना वेग आला होता.

अखेर मनसेने अधिकृत पत्र देत खेडेकर यांची हकालपट्टी केली. त्यांच्यासोबत अविनाश सौंदळकर, संतोष नलावडे आणि सुबोध जाधव या तिघांनाही पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली तेव्हापासून वैभव खेडेकर हे त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे होते. कोकणात मनसेचा पाया रचण्यात त्यांचा मोठा वाटा होता. दापोली आणि खेड परिसरात त्यांचा मजबूत जनसंपर्क असून, तरुणांमध्ये त्यांची चांगली लोकप्रियता आहे. खेड नगरपरिषदेत मनसेला बहुमत मिळवून देण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. ते यापूर्वी खेड नगराध्यक्षही राहिले होते.

गेल्या काही आठवड्यांत वैभव खेडेकर भाजपच्या व्यासपीठांवर दिसू लागले होते. दापोलीत झालेल्या महायुतीच्या सभेत ते प्रमुख नेत्यांसोबत उपस्थित होते. यावेळी महायुतीतील काही नेत्यांनी त्यांना भाजपमध्ये प्रवेशाचे खुले संकेत दिले. खेडेकर यांनी मात्र सार्वजनिकरित्या आपला प्रवेश नाकारला होता, पण त्यांच्या निकटवर्तीयांनी “प्रवेश जवळपास ठरलेला” असल्याचे सूचित केले होते.

मनसेकडून खेडेकर यांना पाठवण्यात आलेल्या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे की, पक्षाच्या धोरणांचे उल्लंघन आणि पक्षविरोधी कारवाया यामुळे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने त्यांना बाहेर काढण्यात येत आहे. त्यांच्यासह इतर तिघांचीही हकालपट्टी याच कारणांमुळे झाली आहे. यामुळे मनसेतील अंतर्गत नाराजी आणि हालचाली अधिक प्रकर्षाने समोर येऊ लागल्या आहेत.

वैभव खेडेकर यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत दापोली मतदारसंघातून उमेदवारी घेतली होती. मात्र त्या वेळी त्यांचा पराभव झाला. तरीसुद्धा कोकणातील मनसेची संघटनात्मक जबाबदारी त्यांनी खांद्यावर घेतली होती. शिंदे गटातील नेते रामदास कदम आणि योगेश कदम यांच्यासोबत त्यांचा संघर्ष अनेक वर्षे चालला. मात्र अलीकडेच दापोलीत झालेल्या कार्यक्रमात दोन्ही बाजूंनी मतभेद विसरण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून आले. वैभव खेडेकर हे केवळ संघटक नसून राज ठाकरे यांचे विश्वासू शिलेदार म्हणून ओळखले जात होते. कोकणात मनसेला स्वतंत्र ओळख मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. अशा नेत्याची हकालपट्टी म्हणजे मनसेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. विशेषत: कोकणात तरुणांमध्ये त्यांची क्रेझ असल्याने पक्षाला आता संघटनात्मक आव्हान उभे राहू शकते.

मनसेतून बाहेर पडल्यानंतर वैभव खेडेकर कोणत्या पक्षात जातील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपने त्यांना खुलं आमंत्रण दिल्याचे संकेत आहेत. जर खेडेकर भाजपमध्ये दाखल झाले, तर कोकणात भाजपला संघटनात्मक बळ मिळू शकते. यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि पुढील विधानसभा निवडणुकीतही समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. मनसेतील ही कारवाई म्हणजे केवळ शिस्तभंगापुरती नसून, आगामी राजकीय घडामोडींचा संकेत मानला जात आहे. वैभव खेडेकर यांच्यासारखा जुना आणि लोकप्रिय चेहरा पक्षातून बाहेर पडणे हे मनसेसाठी निश्चितच मोठे आव्हान आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (मनसे) मोठी हालचाल घडली आहे. पक्षाचे राज्य सरचिटणीस आणि कोकणातील महत्त्वाचे संघटक वैभव खेडेकर यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या भाजप किंवा शिवसेना (शिंदे गटात) प्रवेशाबाबत चर्चांना वेग आला होता. अखेर मनसेने अधिकृत पत्र देत खेडेकर यांची हकालपट्टी केली. त्यांच्यासोबत अविनाश सौंदळकर, संतोष नलावडे आणि सुबोध जाधव या तिघांनाही पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!