कीर्तन, भजन आणि रांगोळी प्रदर्शनाने रंगला भक्तिमय सोहळा
रेवदंडा | सचिन मयेकर
रेवदंडा येथील गोळा स्टॉपजवळील श्री कालभैरव मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री कालभैरव उत्सव भक्तिभाव, उत्साह आणि पारंपरिक वातावरणात बुधवार, दि. १२ नोव्हेंबर २०२५ रोजी मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
सायंकाळी ५ वाजता सुप्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. आठवले बुवा यांच्या प्रभावी आणि भावस्पर्शी कीर्तनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यांच्या कीर्तनातील ओव्या, कथा आणि अभंग श्रवण करताना भाविक मंत्रमुग्ध झाले. त्यानंतर पारंपरिक विधीपूर्वक जन्मकाळाचा सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला.
संध्याकाळी ७ वाजता श्री महाकाली प्रासादिक भजन मंडळ, रेवदंडा यांनी सादर केलेल्या भक्तिगीतांनी उत्सवाचे वातावरण अधिकच भारले. त्यानंतर रात्री ९ वाजता ज्ञानेश्वरी भजन मंडळ, सातारा यांनी सादर केलेल्या भारूड कार्यक्रमाने उत्सवाला भक्तिरसाची परमोच्च उंची मिळवून दिली. अध्यात्म आणि भावनांचा सुंदर संगम त्यांच्या सादरीकरणातून अनुभवायला मिळाला.
उत्सवाच्या निमित्ताने हरेश्वर मंदिरात भव्य रांगोळी प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उदघाटन वैष्णवी कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्सचे मालक तसेच रेवदंडा ग्रुप ग्रामपंचायत सदस्य संतोष मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. स्थानिक कलाकारांनी साकारलेल्या जिवंत भासणाऱ्या रांगोळ्यांनी भाविकांचे लक्ष वेधून घेतले आणि सर्वांची प्रशंसा मिळवली.
दिवसभरात उत्सवाला पूरक अशा फनी गेम्स, संगीत खुर्ची, रांगोळी स्पर्धा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महिलांनी या स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संगीत खुर्ची स्पर्धेत माधुरी शाम पाटील यांनी प्रथम, माधुरी चुनेकर यांनी द्वितीय आणि नीलम भगवान तांबडकर यांनी तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पैठणी भेट देण्यात आली.
कार्यक्रमास रेवदंडा ग्रामपंचायतीचे सरपंच प्रफुल्ल मोरे आणि त्यांच्या पत्नी भारती मोरे यांनी उपस्थिती लावली. भक्तिरस, परंपरा आणि सामाजिक ऐक्य यांचा संगम घडवणारा श्री कालभैरव उत्सव हा यंदाही भाविकांच्या मनावर अधिराज्य गाजवून गेला.
