• Fri. Jul 11th, 2025 11:33:25 PM

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

शिवसेना ठाकरे गटाच्या बैठकीत खासदार आमदारांसह पक्षाचे लोकप्रतिनिधी ‘एकला चलो रे’ची भूमिका घेण्याची शक्यता!

ByEditor

Aug 15, 2023

मिलिंद माने
मुंबई :
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उद्यापासून लोकसभा निवडणुकीच्या जागांचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत खासदार आमदार यांच्यासह जिल्हाप्रमुख ,शहर प्रमुख, तालुकाप्रमुख, माजी खासदार, माजी आमदार, शहरप्रमुख विधानसभा प्रमुख विधानसभा संपर्कप्रमुख, उपजिल्हाप्रमुख आदी उपस्थित राहणार असले तरी या या बैठकीत सर्वच लोकप्रतिनिधी ‘एकला चलो रे’ची भूमिका घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे राज्यातील लोकसभेच्या 48 जागांचा आढावा घेणार असून 16 ते 19 ऑगस्ट दरम्यान पहिल्या टप्प्यात एकूण 16 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत. राज्यात महाविकास आघाडी सरकार गेल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील खासदार व आमदार हे शिवसेना शिंदे गटाकडे गेल्याने उद्धव ठाकरे गटाला मोठ्या अडचणींचा सामना मागील दीड वर्षापासून करावा लागला आहे. न्यायालयीन प्रक्रिये बरोबरच राज्यातील सर्व जिल्ह्यातील ठाकरे गटातील असणाऱ्या शिवसैनिकांची द्विधा मनस्थिती झाली असल्याने त्यांच्यासाठी वारंवार घेण्यात येणारे मेळावे, बैठका व त्यातून मिळणारा प्रतिसाद बघता येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत तसेच स्थानिक स्वराज्य संस्था व विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाची काय भूमिका असावी यासाठी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित केली जाते याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि शरद पवार यांच्यात होणाऱ्या वारंवार भेटीमुळे महाविकास आघाडीमध्ये तसेच शिवसेनेच्या आमदार खासदार व लोकप्रतिनिधींमध्ये शरद पवारांच्या भूमिकेबद्दल संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे. काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाकडून आपापल्या पक्षाच्या उद्यापासून लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर बैठका घेण्यात येणार आहे. ठाकरे गटाच्या बैठकांचा पहिल्या टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे

16 ऑगस्ट आढावा
दुपारी साडेबारा वाजता नंदुरबार लोकसभा मतदारसंघ
दुपारी दीड वाजता धुळे लोकसभा मतदारसंघ
दुपारी साडेचार वाजता जळगाव लोकसभा मतदारसंघ
सायंकाळी साडेपाच वाजता रावेर मतदार संघ

17 ऑगस्ट आढावा
दुपारी साडेबारा वाजता नगर लोकसभा मतदारसंघ
दुपारी साडेचार वाजता नाशिक लोकसभा मतदारसंघ
सायंकाळी साडेपाच वाजता दिंडोरी लोकसभा मतदारसंघ

18 ऑगस्ट आढावा
दुपारी साडेबारा वाजता मावळ लोकसभा मतदारसंघ
दुपारी दीड वाजता शिरूर लोकसभा मतदारसंघ
दुपारी साडेचार वाजता बारामती लोकसभा मतदारसंघ
सायंकाळी साडेपाच वाजता पुणे लोकसभा मतदारसंघ

19 ऑगस्ट आढावा
दुपारी साडेबारा वाजता सातारा लोकसभा मतदारसंघ
दुपारी दीड वाजता सांगली लोकसभा मतदारसंघ.
दुपारी साडेचारला कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ
सायंकाळी साडेपाचला हातकणंगले लोकसभा मतदारसंघ

महाविकास आघाडी सरकार सत्तेतून पायउतार झाल्यानंतर तब्बल दीड वर्षानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे राष्ट्रवादीतील आमदारांना सोबत घेऊन सरकारमध्ये सामील झाले आहेत. सद्यस्थितीत त्यांच्याबरोबर किती आमदार आहेत याची कल्पना जरी येत नसली तरी शरद पवार व अजित पवार यांच्या वारंवार भेटीमुळे महाविकास आघाडीमधील आमदार, खासदार तसेच जिल्हा व शहर पातळीवरील सामान्य कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. शरद पवार बोलतात एक आणि करतात एक अशी त्यांची भूमिका असल्याने त्यांची नेमकी भूमिका काय हे महाविकास आघाडीतील नेत्यांना देखील समजत नसल्याने आघाडीमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भाजपा पक्षाला साजेशी भूमिका असल्याने येणाऱ्या निवडणुकीत सामान्य जनतेला कोणत्या तोंडाने सामोरे जायचे अशी स्थिती काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची झाली असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शिवाय शिवसेना व काँग्रेस या दोन पक्षांनी मिळून लोकसभेच्या निवडणुका एकत्र लढवण्याच्या त्यांनी वेगळा प्लॅन तयार केला असून त्यासाठी दोन्ही पक्षांनी लोकसभा निहाय मतदार संघाचा आढावा व लोकसभा मतदारसंघात बैठकांचे सत्र चालू केले आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आयोजित केलेल्या लोकसभानिहाय मतदार संघाच्या बैठकीला त्या त्या मतदारसंघातील संपर्क नेते, स्थानिक उपनेते, जिल्हासंपर्कप्रमुख, स्थानिक विभागीय महिला संघटिका, जिल्हाप्रमुख, खासदार, आमदार, माजी खासदार, माजी आमदार, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख शहरप्रमुख (प्रमुख शहरातील), विधानसभाप्रमुख, विधानसभा संपर्कप्रमुख (मुंबई) उपस्थित राहणार असले तरी सर्वजण ‘एकला चलो’ची भूमिका घेणार असल्याची चर्चा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील आमदार व लोकप्रतिनिधीमध्ये दबक्या आवाजात ऐकावयास मिळत आहे. मात्र या बैठकीत सर्व लोकप्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर अंतिम निर्णय मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे घेणार आहेत. त्यामुळे या बैठकीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट काय निर्णय घेतो यावरच शिवसेनेला समर्थन देणाऱ्या काँग्रेस पक्षाची भूमिका अवलंबून राहणार असल्याची चर्चा राजकीय निरीक्षकांमध्ये ऐकण्यास मिळत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!