सलीम शेख
माणगाव : माणगाव-मोर्बा रस्त्यावर निळगुण गावच्या हद्दीत हॉटेल मून पॅलेस समोर अंधारात धोकादायक स्थितीत उभ्या असलेल्या ट्रेलरवर रिक्षा धडकून झालेल्या अपघातात रिक्षामधील एकाच कुटुंबातील ५ जण जखमी झाले. जखमींमध्ये ३ लहान मुलांचा समावेश आहे. सदरील अपघात दि. १४ ऑगस्ट २०२३ रोजी रात्री ८:१५ वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघाताची फिर्याद इसाक हुसेन सनगे (वय-६०) रा. दहिवली ता. माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.
सदर अपघाताच्या गुन्ह्याबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, अपघातातील आरोपी ट्रेलर चालक मोहम्मद सेहनशाह मेराज अहंमद (वय -२४) रा. पुरे, जि. अयोध्या राज्य. उत्तरप्रदेश याने त्याच्या ताब्यातील ट्रेलर कर. एम. एच. ४३ बी. एक्स ९९३७ हि गाडी प्रवासादरम्यान रस्त्यात बंद पडलेली असताना इतर वाहनांना सूचना देण्याकरिता वाहनास रिप्लेक्टर अथवा सूचना दर्शक सिग्नल न लावता वाहन धोकादायक स्थितीत लावल्याने या ट्रेलरवर रात्रीच्या अंधारात रिक्षा क्र . एम. एच. ०६ झेड o६७३ हि धडकली. या अपघातात रिक्षामधील एकाच कुटुंबातील मुस्तफा उस्मान शहा (वय-४० ), अबिदा मुस्तफा शहा (वय- ३७), रिहान मुस्तफा शहा (वय- ०५), अरफाद मुस्तफा शहा (वय- ०७), जुहेद मुस्तफा शहा (वय- ०३) हे ५ जण जखमी होऊन रिक्षाचा चुराडा झाला. जखमींवर माणगाव उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार झाल्यावर त्यांना अधिक औषधोपचारासाठी मुंबईला हलविण्यात आले.
या अपघाताची माहिती समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी माणगाव नितीनकुमार पोंदकुले, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक श्री. गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत भोजकर यांनी अपघात ठिकाणी व उपजिल्हा रुग्णालयात भेट दिली. या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात कॉ . गु. रजि. नं. २६६/२०२३ भादंवि संहिता कलम २७९, ३३७, ३३८ मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे करण्यात येऊन आरोपी ट्रेलर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर अपघाताच्या गुन्ह्याचा अधिक तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत भोजकर हे करीत आहेत.