• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

दिवंगत कर्मचाऱ्याच्या मुलीची केली नियुक्ती !

ByEditor

Aug 15, 2023

वडिलांच्या अपघातानंतर १० दिवसात अनुकंपा भरतीत घेतले सामावून

सलीम शेख
माणगाव :
स्वातंत्र्य दिनाच्या ७६ व्या वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम माणगाव तालुक्यामध्ये पोलीस परेड मैदान येथे मोठया दिमाखात पार पडला. उपविभागीय अधिकारी माणगाव संदिपान सानप यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी तहसीलदार माणगाव विकास गारुडकर, अप्पर तहसीलदार महेंद्र बेलदार, अपर तहसीलदार विनायक घुमरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री फोंडकुळे, तसेच इतर सर्व कार्यालय प्रमुख, महसूल कर्मचारी, राजकीय सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी, पत्रकार बांधव, माजी सैनिक, निवृत्त अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. शाळकरी मुलांची संख्या ही लक्षणीय होती.

ध्वजारोहणानंतर एक अत्यंत भावनिक, हृदयस्पर्शी तसेच प्रशासनासाठी कौतुकास्पद सोहळा पार पडला. तहसील कार्यालयातील कर्मचारी दिवंगत प्रदीप सोनावळे यांचे दिनांक ५ ऑगस्ट रोजी अपघाती निधन झाले. त्यांच्या कुटुंबावर हा एक प्रचंड मोठा आघात होता. कुटुंब दुःखात असताना माननीय उपविभागीय अधिकारी संदिपान सानप व तहसीलदार माणगाव विकास गारुडकर यांनी कुटुंबाचे सांत्वन केले. त्याचप्रमाणे दिवंगत प्रदीप सोनावळे यांची मुलगी कुमारी पूजा सोनावळे हिला अनुकंपा भरतीसाठी अर्ज करण्यास मार्गदर्शन केले आणि सोनवळे कुटुंबीयांवर असलेले दुःख हलके करण्याचा प्रयत्न केला.

जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांच्या कानावर जेव्हा ही गोष्ट पडली त्यावेळी त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन पूजा सोनावळे यांची अनुकंपा भरती लवकरात लवकर करण्याच्या सूचना दिल्या. त्यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी कार्यालय तर्फे पूजा सोनावळे हिचे अनुकंपा भरतीचे आदेश काढण्यात आले. अपर जिल्हाधिकारी श्री. थोरवे व निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी ही प्रक्रिया लवकरात लवकर पार पाडावी यासाठी स्वतः जातीने लक्ष घातले. आज दिनांक १५ ऑगस्ट रोजी पूजा सोनावळे हिला उपविभागीय अधिकारी माणगाव यांच्या हस्ते नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉक्टर योगेश म्हसे यांच्या संवेदनशीलतेमुळे व प्रशासनाच्या सक्रिय योगदानामुळे आज एका दिवंगत सरकारी कर्मचाऱ्याच्या वारसास दहा दिवसांत अनुकंपा भरती मध्ये नियुक्ती आदेश मिळण्याची ही कदाचित महाराष्ट्रातील पहिलीच घटना असावी. खऱ्या अर्थाने आज महसूल सप्ताहाचा उद्देश सफल झाला आहे असे वाटते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!