जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यशाची शिखरे पादाक्रांत करा : मिलिंद पाटील
पेण | विनायक पाटील
नियमित अभ्यास, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर ज्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे, त्या सर्वांचे कौतुक आहे. मात्र, ज्यांना यावर्षी पारितोषिक मिळाले नाही, त्यांनी खचून न जाता अधिक जोमाने प्रयत्न करावेत. अभ्यासासोबतच खेळांतही प्राविण्य मिळवून पुढील वर्षी यशस्वी होण्याचे ध्येय ठेवावे, असे आवाहन भाजप रायगड जिल्हा उपाध्यक्ष तथा विद्यालयाचे माजी विद्यार्थी मिलिंद पाटील यांनी केले.
वाशी येथील ए. टी. पाटील विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पाटील म्हणाले की, “आपल्या जडणघडणीत शिक्षक आणि पालकांचा सिंहाचा वाटा असतो. त्यांचा आदर केल्यास तुम्ही जीवनात नक्कीच उंच शिखरे गाठाल.”
गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

कार्यक्रमात मार्च २०२५ मधील एस.एस.सी. परीक्षेतील गुणवंतांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये:
- प्रथम क्रमांक: पूर्वा उदय मढवी (९३.६०%)
- द्वितीय क्रमांक: मीनाक्षी जितेंद्र थवई (८३.२०%)
- तृतीय क्रमांक: अस्मिता संदेश म्हात्रे (८२.८०%)
तसेच ऋषिकेश राजू मोकल (आदर्श विद्यार्थी), पायल विश्वास पाटील (आदर्श विद्यार्थिनी), राज संजय पाटील (चॅम्पियन विद्यार्थी) आणि सानिया संतोष म्हात्रे (चॅम्पियन विद्यार्थिनी) यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व बक्षीस देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून अथर्व अविनाश थवई व वेदिका विजय थवई यांचाही सन्मान करण्यात आला.
विविध स्पर्धांचे आयोजन
शालेय क्रीडा महोत्सवांतर्गत कबड्डी, खो-खो, धावणे, डॉजबॉल, लंगडी, रिले यांसारख्या मैदानी खेळांसह वक्तृत्व, निबंध, हस्ताक्षर, चित्रकला, प्रश्नमंजुषा, गायन आणि रांगोळी अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व स्पर्धांमधील विजेत्यांना यावेळी सन्मानित करण्यात आले.
’सागर’ विशेषांकाचे प्रकाशन
या सोहळ्याचे खास आकर्षण म्हणजे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ‘सागर’ विशेषांकाचे दिमाखात प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी वाशीचे सरपंच संदेश ठाकूर, शाळेचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील, उपाध्यक्ष श्रीकांत पाटील, स्मिता अनिश पाटील, गणेश थवई, एम. के. पाटील, सागर शिक्षण मंडळाचे पदाधिकारी, शालेय समिती सदस्य, शिक्षक वृंद आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेंद्र म्हात्रे सर यांनी केले.
