माणगाव | सलीम शेख
ताम्हिणी घाटातील कोंडेथर गावाच्या हद्दीत शुक्रवारी सकाळी एका खासगी ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात झाला. पुण्याहून कोकणाकडे पर्यटनासाठी निघालेल्या या बसमधील ५० पर्यटकांपैकी २७ प्रवासी गंभीर जखमी झाले असून, २३ जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींमध्ये महिला प्रवाशांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.
नियंत्रण सुटल्याने बस डोंगराला धडकली
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-भोसरी येथील ‘शिव महिंद्रा’ कंपनीचे कर्मचारी श्री दत्तकृपा ट्रॅव्हल्सच्या बसने (क्र. MH 14 MT 9394) पर्यटनासाठी कोकणात जात होते. दुपारी ११:३० वाजण्याच्या सुमारास कोंडेथर जवळील एका अतिशय अवघड आणि अपघातप्रवण वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. परिणामी, ही बस रस्त्याकडेला असलेल्या डोंगराच्या कठड्यावर जोरात आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, अनेक प्रवासी जागेवरच जखमी झाले, तर काही जण काचा फुटल्याने गंभीर जखमी झाले.
स्थानिक आणि प्रशासनाकडून तातडीने मदत
अपघातानंतर परिसरात प्रवाशांच्या किंकाळ्यांनी एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी आणि मार्गावरून जाणाऱ्या इतर प्रवाशांनी मदतीसाठी धाव घेतली. त्यानंतर माणगाव पोलीस, रुग्णवाहिका आणि आपत्कालीन सेवा घटनास्थळी दाखल झाल्या.
गंभीर जखमींना माणगाव उपजिल्हा रुग्णालय तसेच पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनीच्या रुग्णवाहिकेतून तातडीने हलवण्यात आले. या अपघातामुळे घाटात दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. वाहतूक पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.
अपघातप्रवण क्षेत्राचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
ताम्हिणी घाटातील अरुंद रस्ते, तीव्र वळणे आणि अनेकदा असणारे दाट धुके यामुळे हा मार्ग कायमच धोकादायक ठरत आहे. या परिसरात वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. धोकादायक वळणांवर अधिक मजबूत संरक्षक कठडे आणि सूचना फलक लावण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
जखमी प्रवाशांची नावे:
तृप्ती कोळणे (२७), हर्षन एव्हल (२४), नुमान अत्तार (२३), समीर साळुंखे (३८), सुजल घोरपडे (२१), तोहिद शेख (२५), स्नेहल वर्मा (२१), आफरीन इमामदार (२५), मालकिनी लोटे (२९), खुशबू जिसान (३४), श्वेता उघाडे (२२), अंजली गडकर (३१), वर्षा मार्लर (२७), प्रीती मोरे (२३), सारिका मुजेवार (४३), साक्षी पाटील (२४), अंजली डायव्ह (२६), वैभव सांबुचे (२६), कृष्णा भोसले (३०), तृप्ती चव्हाण (३७), पाटील महादेव रेही (३१), नवीन वाळुज (२८), विकास कांबळे (३१), आसिफ शिगलगाकर (२९), शुभम साधू (२४), गणेश देशमुख (२८), अभिषेक वहार (२६), प्रवीण विठेकर (५३), प्रतीक्षा टिके (२७), संदेश बहामर (३७), सृष्टी कदम (२४), वर्षा नंदरगो (२७), सुनफर खलिफ (३३), सुमन अत्तार (२३), वैष्णवी मोरे (४८), आकाश कोवळे (२८), वैष्णवी काटकर (४८), अमर चलवाडी (२५), आकाश नारायण (२८), प्राची चन्ने (२८), प्राजक्ता मोरे (२०), प्रसाद भालेराव (२०), प्रशांत बांगर (४५), जितेश चांदनीपुरे (३५), कुणाल बडे (३४), प्रिया सुतला (३५), सागर कापडे (२९), प्रदीप लाडे (४३), धनंजय यकासरे (२९), सचिन बोधे (३६).
