उद्योजक सुमित काते यांच्याकडून ३ लाखांचा निधी; ग्रामस्थांची मागणी मार्गी
नागोठणे | किरण लाड
नागोठणे येथील केएमजी विभाग, कुंभारआळी येथील ऐतिहासिक श्री गणपती व हनुमान मंदिर परिसरात सुसज्ज शेडयुक्त सभामंडप उभारण्याच्या कामाचे भूमिपूजन शिवसेनेचे (शिंदे गट) युवा उद्योजक सुमित काते यांच्या हस्ते रविवारी (४ डिसेंबर) उत्साहात संपन्न झाले. या विकासकामामुळे कुंभारआळीतील ग्रामस्थांची अनेक वर्षांची मागणी आता पूर्ण होत आहे.

कुंभारआळीतील हे मंदिर पुरातन असून येथे माघी गणेशोत्सव, हनुमान जन्मोत्सव, पालखी सोहळा आणि संत गोराकुंभार पुण्यतिथी सोहळा मोठ्या प्रमाणावर साजरे होतात. या कार्यक्रमांसाठी हजारो भाविक उपस्थित राहत असल्याने येथे कायमस्वरूपी शेडची आवश्यकता होती. यासंदर्भात ग्रामस्थांनी राज्याचे फलोत्पादन व ईजीएस मंत्री भरतशेठ गोगावले यांच्याकडे निवेदन दिले होते. नामदार गोगावले यांच्या सूचनेनुसार, शिवसेनेचे युवा उद्योजक सुमित काते यांनी तातडीने ३ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला.

या भूमिपूजन समारंभास शिवसेनेचे रोहा उपतालुका प्रमुख मनोज खांडेकर, विभाग प्रमुख प्रविण ताडकर, शहर प्रमुख संतोष चितळकर, युवासेनेचे तालुका सचिव ॲड. मंदार कोतवाल, संपर्क प्रमुख संजय कणघरे, कोकण पर्यटन संस्थेचे अध्यक्ष प्रकाश मोरे, सामाजिक कार्यकर्ते संजय पिंपळे, बालाराम पोटे यांच्यासह शिवसेना व युवासेनेचे अनेक पदाधिकारी, शिवसैनिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुमित काते यांचे ग्रामस्थांकडून आभार
”कुंभारआळी ग्रामस्थांच्या निवेदनाची दखल घेत नामदार भरतशेठ गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली सुमित काते यांनी तत्परतेने निधी उपलब्ध करून दिला. या सामाजिक बांधिलकीबद्दल रोहा तालुका कुंभार समाजाचे अध्यक्ष दीपक नागोठणेकर, श्रीधर आप्पा नागोठणेकर, प्रमोद नागोठणेकर, संदीप राऊत यांच्यासह कुंभारआळीतील ग्रामस्थ मंडळ व महिला मंडळाने सुमित काते यांचे विशेष आभार मानले असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.”
