• Mon. Jan 26th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रेवदंडा-साळाव पुलाच्या मोजणीवेळी राडा; सरकारी अभियंत्यावर जीवघेणा हल्ला

ByEditor

Jan 21, 2026

चौलमधील धक्कादायक घटना; सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी एकाला अटक

रेवदंडा । सचिन मयेकर
रेवदंडा-साळाव पुलाच्या कामासाठी सुरू असलेल्या जमीन मोजणी दरम्यान एका सरकारी अभियंत्यावर थेट हल्ला झाल्याची खळबळजनक घटना मंगळवारी (दि. २०) चौल येथे घडली. याप्रकरणी रेवदंडा पोलिसांनी त्वरित पावले उचलत एका आरोपीला अटक केली असून सरकारी कामात अडथळा आणणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे.

नेमकी घटना काय?

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (MSRDC) रेवदंडा-साळाव पुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी ‘रोडिक कन्सलटंट प्रा. लि.’ (नवी दिल्ली) या कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी १०:३० च्या सुमारास चौल येथील रामेश्वर राईस मिलच्या मागील मोकळ्या जागेत जमीन मोजणीचे काम सुरू होते. यावेळी कंपनीचे अभियंता सुरेंद्र चंद्रभान सिंग (वय ३३) हे कामावर देखरेख करत होते.

त्याच वेळी आरोपी मोहसीन अहमद तांडेल आणि मुफेज मोहसीन तांडेल (दोघे रा. रेवदंडा) हे तेथे आले. “आमच्या जागेत का आलात?” असे म्हणत त्यांनी अभियंत्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.

मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी

हा वाद इतका विकोपाला गेला की आरोपींनी सुरेंद्र सिंग यांना शिवीगाळ व दमदाटी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपी मुफेज तांडेल याने अभियंत्यावर लाकडी पट्टीने हल्ला करत मारहाण केली. या हल्ल्यात अभियंता जखमी झाले असून दोन्ही आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

पोलिसांची तत्काळ कारवाई

घटनेची माहिती मिळताच रेवदंडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२१(१), १३२, ३५२, ३५१(२) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास मुफेज मोहसीन तांडेल याला अटक केली असून, दुसरा आरोपी मोहसीन तांडेल याच्याविरोधात तपास सुरू आहे.

“शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. या प्रकरणातील एका आरोपीला अटक केली असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे,” असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!