उरण | अनंत नारंगीकर
‘हर घर नल से जल’ या घोषणेसह प्रत्येकाच्या घरापर्यंत शुद्ध पिण्याचे पाणी पोहोचवण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने जल जीवन मिशन अंतर्गत कोट्यवधींचा निधी मंजूर केला आहे. मात्र, उरण तालुक्यात या योजनेचा पुरता बोजवारा उडाला असून, प्रशासकीय दुर्लक्ष आणि कंत्राटदारांच्या मनमानीमुळे निकृष्ट दर्जाची कामे होत असल्याचा संताप नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
१० कोटींची कामे वादाच्या भोवऱ्यात
उरण तालुक्यात सध्या जल जीवन मिशन अंतर्गत साधारण १० कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. मात्र, काम सुरू असलेल्या ५० टक्क्यांहून अधिक गावांमधून प्रशासनाकडे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. नियमानुसार कामे होत नसल्याने अनेक ठिकाणी नवीन पाईपलाईनला अल्पावधीतच गळती लागली आहे. यामुळे एकीकडे पाण्याचे नियोजन कोलमडले आहे, तर दुसरीकडे शासनाचा लाखो रुपयांचा निधी पाण्यात जात आहे.

अटी-शर्ती धाब्यावर; निकृष्ट साहित्याचा वापर
योजनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार उच्च दर्जाचे पाईप वापरणे अपेक्षित असताना, अनेक ठिकाणी नामांकित कंपन्यांच्या (प्लास्टो इ.) ऐवजी स्वस्त आणि निकृष्ट दर्जाच्या पाईपचा वापर करण्यात आला आहे. तसेच पाईप टाकताना केले जाणारे सिमेंट काँक्रीटीकरण निकृष्ट असल्याने जमिनीचा दाब वाढताच पाईप फुटण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक गावांत कामे अर्धवट स्थितीत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
चिरनेर-हेटवणे जलवाहिनीलाही फटका
सध्या बांधपाडा, कळंबुसरे आणि कोप्रोली ग्रामपंचायत हद्दीतील पाणीपुरवठ्यासाठी चिरनेरमधून जाणाऱ्या सिडकोच्या हेटवणे जलवाहिनीवरून योजना राबवण्यात आली आहे. मात्र, येथेही निकृष्ट कामामुळे वारंवार गळती लागत असल्याने हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे.
”प्रशासकीय अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या संगनमतामुळे ही योजना भ्रष्टाचाराचे कुरण बनली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी उरणकर जनतेतून होत आहे.
यापूर्वी विधीमंडळातही या योजनेच्या कामांवरून गदारोळ झाला होता. आता उरणमधील ही परिस्थिती पाहता वरिष्ठ पातळीवरून चौकशी होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
