म्हसळा येथे निवडणूक मध्यवर्ती कार्यालयाचे थाटात उदघाटन; विकासकामांचा धडाका सुरूच राहणार असल्याचा विश्वास
म्हसळा | वैभव कळस
म्हसळा तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ माजी आमदार भाई जयंत पाटील यांनी तालुक्याचा झंझावाती दौरा केला. या दौऱ्याचे औचित्य साधून म्हसळा येथे महाविकास आघाडीच्या निवडणूक मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले. यावेळी मतदारांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता आघाडीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले.
उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना भाई जयंत पाटील भावूक झाले. ते म्हणाले, “आमच्या वडिलांपासून, म्हणजेच भाई प्रभाकर पाटील यांच्या काळापासून या तालुक्याशी आमचे जिव्हाळ्याचे नाते आहे. प्रभाकर पाटील यांनी तालुक्यात अनेक विकासकामे मार्गी लावली असून, दुर्गम गावांसाठी पाणीपुरवठा योजना प्रभावीपणे राबविल्या आहेत.”
शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून तालुक्यात सुरू असलेला विकासाचा धडाका यापुढेही अखंडितपणे सुरू राहील, अशी ग्वाही पाटील यांनी दिली. “तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही,” असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. विरोधकांच्या भूलथापांना उत्तर म्हणून महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना व मतदारांना केले.
या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना (उबाठा) उपजिल्हाप्रमुख नंदू शिर्के, जि. प. उमेदवार संतोष पाटील, रोशन पारवे, पंचायत समिती उमेदवार कृष्णा म्हात्रे, चैतन्या गजमल, रमेश खोत, ज्योती गिजे यांच्यासह माजी चिटणीस परशुराम मांदाडकर, राजाराम धुमाळ, राजाराम तिलटकर, दीपल शिर्के, कौस्तुभ करडे, सचिन गिजे, हेमंत नाक्ती आणि महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
