• Wed. Feb 11th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

अजितदादा म्हणजे दिशा देणारे नेतृत्व; उरणमध्ये भावूक वातावरणात वाहिली श्रद्धांजली

ByEditor

Jan 31, 2026

​उरण | घन:श्याम कडू
महाराष्ट्राच्या राजकारणात शिस्त, निर्णयक्षमता आणि विकासाचा ठसा उमटवणारे कणखर नेतृत्व अजितदादा पवार यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी उरणमध्ये भावपूर्ण श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या वतीने भोईर्स गार्डन येथे पार पडलेल्या या सभेत अजितदादांच्या नेतृत्वाचा आणि कार्यशैलीचा आढावा घेताना उपस्थितांच्या डोळ्यांत भावना तरळत होत्या. “दादा म्हणजे केवळ आदेश नव्हे, तर कार्यकर्त्यांना दाखवलेली दिशा होती,” अशा शब्दांत अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

​यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपप्रदेशाध्यक्षा तथा उरण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा भावना घाणेकर, माजी आमदार मनोहर भोईर, माजी शिक्षक आमदार बाळाराम पाटील, उपजिल्हाप्रमुख नरेश रहालकर, मनसे जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर, उरण सामाजिक संस्थेचे संतोष पवार, माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे, परमानंद करगुटकर यांच्यासह विविध पक्षांचे नेते, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते आणि महिला प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अजितदादांशी निकटचे स्नेहसंबंध असलेल्या भावना घाणेकर बोलताना अत्यंत भावूक झाल्या. “आजही दादा आपल्यात नाहीत, हे मान्य करायला मन तयार होत नाही. ते केवळ नेते नव्हते, तर कुटुंबाचा आधार होते,” असे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले.

​माजी आमदार मनोहर भोईर यांनी अजितदादांचा उल्लेख ‘महाराष्ट्राच्या विकासाचे इंजिन’ असा केला. त्यांच्या नेतृत्वामुळेच उरणसारख्या भागाला विकासाचे बळ मिळाले असून असा नेता पुन्हा होणे कठीण असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच माजी शिक्षक आमदार बाळाराम पाटील यांनी दादांच्या शिस्तप्रिय प्रतिमेमागची माणुसकी उलगडली. प्रशासनावर दांडगा वकुफ असलेला हा नेता कार्यकर्त्यांच्या दुःखात कायम सोबत उभा राहिला, असे ते म्हणाले. ही सभा केवळ एक औपचारिक कार्यक्रम न ठरता, एका लोकनेत्याच्या राजकीय प्रवासाला आणि कर्तृत्वाला दिलेली कृतज्ञ श्रद्धांजली ठरली.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!