श्रीवर्धन | अनिकेत मोहित
पर्यावरणपूरक, स्वच्छ आणि सुरक्षित समुद्रकिनारा म्हणून जागतिक स्तरावर ओळख मिळवून देणारे ब्ल्यू फ्लॅग नामांकन श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्याला मिळाले असले, तरी त्या अनुषंगाने आवश्यक असलेल्या नियमांची ठोस अंमलबजावणी प्रशासनाकडून होत नसल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
ब्ल्यू फ्लॅग मानांकनासाठी अत्यावश्यक असलेली समुद्रकिनारी स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, पर्यटकांसाठी सुरक्षितता, तसेच किनाऱ्यावरील अस्थापनांवर कडक नियमावली याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक व पर्यावरणप्रेमींमधून केला जात आहे.
विशेषतः समुद्रकिनाऱ्यावरील घोडा व्यवसायामुळे निर्माण होणारी अस्वच्छता ही मोठी समस्या ठरत आहे. घोड्यांची विष्ठा थेट वाळूवर पडत असून, यामुळे दुर्गंधी, आरोग्याच्या समस्या आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, या गंभीर बाबीकडे संबंधित विभागांकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे. याशिवाय, किनाऱ्यावर उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या अस्थापनांबाबत नियमांचे उल्लंघन, कचऱ्याची योग्य विल्हेवाट नसणे, तसेच पर्यावरणपूरक व्यवस्थापनाचा अभाव स्पष्टपणे जाणवत आहे. हे सर्व प्रकार ब्ल्यू फ्लॅगच्या निकषांना थेट छेद देणारे आहेत.
जर अशीच उदासीनता कायम राहिली, तर श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्याचे ब्ल्यू फ्लॅग नामांकन धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून नियमांची कडक अंमलबजावणी करावी, अन्यथा हा केवळ कागदोपत्री सन्मान ठरेल, असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
