• Tue. Feb 10th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

​खोपटे गावातील रस्ता दगडांनी अडवला; ग्रामस्थांचा संताप, आंदोलनाचा इशारा

ByEditor

Feb 2, 2026

​पोलीस पाटलांच्या मनमानी कारभारावर नागरिकांची नाराजी; रस्ता मोकळा करण्याची मागणी

​उरण | विठ्ठल ममताबादे
तालुक्यातील खोपटे गावाच्या वेशीवर असलेल्या मुख्य रस्त्यावर मोठमोठे दगड ठेवून रस्ता अडवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील पोलीस पाटील रंगनाथ पाटील यांनीच हा रस्ता अडवल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. या प्रकारामुळे संपूर्ण गावात संतापाची लाट उसळली असून, दगड न हटवल्यास जनआंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे.

​खोपटे गावातील वेशीवर असलेल्या रस्त्यावर अचानक मोठमोठे दगड टाकण्यात आले आहेत. हा रस्ता जाणीवपूर्वक अडवण्यात आल्याने येथील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. विशेष म्हणजे, ज्यांच्यावर गावची कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे, तेच पोलीस पाटील या कृत्यात सहभागी असल्याने ग्रामस्थांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. बांधपाडा ग्रामपंचायतीकडे यासंदर्भात वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.

​रस्ता अडवल्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांची मोठी अडचण होत आहे. “गावचे पोलीस पाटीलच जर अशा प्रकारे रस्ता अडवून सर्वसामान्यांना त्रास देत असतील, तर त्यांना या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार उरत नाही,” अशा शब्दांत ग्रामस्थांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

​”रस्त्यातील हे दगड तातडीने न काढल्यास, रस्ता अडवणाऱ्या पोलीस पाटलांच्या विरोधात सर्व ग्रामस्थ मिळून तीव्र जनआंदोलन छेडतील.”
— विनायक पाटील (ज्येष्ठ नागरिक, खोपटे)

सध्या या प्रकरणामुळे खोपटे परिसरात तणावाचे वातावरण असून, स्थानिक प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!