उरण | विठ्ठल ममताबादे
उरण पोलीस ठाण्याच्या हद्दीत धुतुम येथील IOTL कंपनीनजीक असलेल्या ब्रिजवर एक भीषण अपघात घडला. स्वतःच्याच ट्रेलरचा हँडब्रेक लावण्यास विसरल्याने, उतारावरून सरकलेल्या ट्रेलरखाली चिरडून एका ३२ वर्षीय चालकाचा जागीच मृत्यू झाला. बृजभान मुन्डा यादव (रा. भीतरी, जि. सिधी, मध्य प्रदेश) असे मृत चालकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बृजभान यादव हा उरण परिसरात ट्रेलर चालक म्हणून कार्यरत होता. सोमवारी रात्री १ वाजण्याच्या सुमारास तो आपल्या ताब्यातील ट्रेलर (क्रमांक: MH-46-BU-4299) घेऊन जेएनपीटीकडून पनवेलच्या दिशेने जात होता. धुतुम येथील IOTL कंपनी शेजारील ब्रिजवर उतारावर त्याने आपला ट्रेलर थांबवला.
मात्र, खाली उतरताना त्याने ट्रेलरचा हँडब्रेक लावला नाही. ट्रेलरमध्ये जड कंटेनर असल्याने आणि रस्ता उताराचा असल्याने, बृजभान ट्रेलरच्या समोरून जात असतानाच वाहन अचानक पुढे सरकले. अवजड चाकांखाली चिरडल्या गेल्याने तो गंभीर जखमी झाला.
अपघातानंतर त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी उरण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम २८५ आणि १०६(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय साबळे करत आहेत. अवजड वाहन चालवताना करण्यात आलेल्या एका छोट्या निष्काळजीपणामुळे एका निष्पाप मजुराचा जीव गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
