प्रचाराचा धुरळा उडाला; राष्ट्रवादी, शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (ठाकरे गट) आणि अपक्ष उमेदवारांमध्ये कांटे की टक्कर
धाटाव । शशिकांत मोरे
रोहा तालुक्यातील भुवनेश्वर जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांच्या निवडणुकीने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले आहे. या निवडणुकीत कुठे प्रस्थापितांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, तर कुठे नवख्या उमेदवारांनी प्रस्थापितांना आव्हान दिले आहे. भुवनेश्वर गटात चौरंगी, धाटाव गणात तिरंगी, तर भुवनेश्वर गणात दुरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून, मतदारांच्या मनाचा कौल कोणाकडे झुकणार, याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
१. भुवनेश्वर गट: अनुभवी विरूद्ध नवखे असा सामना (चौरंगी लढत)
भुवेश्वर (४१) गटातून चार उमेदवार रिंगणात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रदीर्घ राजकीय अनुभव असलेले माजी जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील (घड्याळ) रिंगणात असून, त्यांच्यासमोर शिवसेना शिंदे गटाचे संदेश मोरे (धनुष्यबाण) आणि शिवसेना ठाकरे गटाचे नितीन वारंगे (मशाल) यांचे तगडे आव्हान आहे. त्यातच पत्रकार दिप वायडेकर (कपबशी) यांनी अपक्ष म्हणून उडी घेतल्याने या लढतीत चुरस वाढली आहे. सुमारे २९,८१२ मतदार या चारही उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत.
२. धाटाव गण: महिला उमेदवारांमध्ये रणधुमाळी (तिरंगी लढत)
धाटाव (८१) गणात महिला आरक्षित जागेसाठी तीन पक्षांच्या महिला उमेदवारांमध्ये जोरदार टक्कर होत आहे.
राष्ट्रवादी: विजया विनोद पाशिलकर (घड्याळ)
शिवसेना (शिंदे गट): स्वप्नाली सचिन मोरे (धनुष्यबाण)
शिवसेना (ठाकरे गट): सुप्रिया नितीन वारंगे (मशाल)
येथील १५,४४९ मतदारांना आकर्षित करण्यासाठी तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आणि महिला आघाडीने घरटी प्रचार सुरू केला आहे.
३. भुवनेश्वर गण: थेट ‘आमने-सामने’ (दुरंगी लढत)
पंचायत समितीच्या भुवनेश्वर (८२) गणात केवळ दोनच उमेदवार रिंगणात असल्याने येथे थेट लढत होत आहे. शिंदे गटाचे कट्टर शिवसैनिक संतोष खेरटकर (धनुष्यबाण) आणि राष्ट्रवादीचे जिल्हा चिटणीस सुरेश मगर (घड्याळ) यांच्यात ही चुरस असून, कुणबी समाजाची मते येथे निर्णायक ठरू शकतात.
राजकीय समीकरणे आणि वर्चस्व
या गटातील एकूण १४ ग्रामपंचायतींपैकी १३ ग्रामपंचायतींवर (वरसे, धाटाव, वाशी इ.) राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे, तर केवळ रोठखुर्द ग्रामपंचायत शिंदे गटाच्या ताब्यात आहे. राष्ट्रवादीने अनुभवी नेत्यांना संधी दिली असली, तरी मतदारांमधून “एवढ्या वर्षात जो विकास झाला नाही, तो आता कसा होणार?” असे प्रश्नही उपस्थित केले जात आहेत. दुसरीकडे शिवसेनेच्या दोन्ही गटांनी नवख्या चेहऱ्यांना संधी दिली आहे, मात्र खमक्या नेतृत्वाचा अभाव असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात आहे.
सोशल मीडिया आणि प्रचाराचा जोर
निवडणुकीच्या प्रचारात सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. विशेषतः राष्ट्रवादी विरुद्ध अपक्ष उमेदवार यांच्यातील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून रंगलेला कलगीतुरा चर्चेचा विषय ठरत आहे.
