खोपोली : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर (Expressway) खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ केमिकल टँकर पलटी झाल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या टँकरमधून होणाऱ्या गॅस गळतीमुळे सुरक्षेच्या कारणास्तव हायवेवरील दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.
मंगळवारी (३ फेब्रुवारी २०२६) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास मुंबईच्या दिशेने जाणारा प्रोपोलिन (Propylene) या ज्वलनशील गॅसचा टँकर आडोशी बोगद्याजवळ उलटला. अपघात होताच गॅसची तीव्र गळती सुरू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले. प्रशासनाने तत्परता दाखवत दोन्ही बाजूंची वाहतूक थांबवली आहे.
वाहतूक कोंडी: एक्सप्रेसवेवर वाहनांच्या अनेक किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या आहेत. वाहतूक जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वळवण्यात आली आहे, मात्र तिथेही लोणावळ्यात प्रचंड ताण आल्याने संथ गतीने प्रवास सुरू आहे. अग्निशमन दल आणि महामार्ग पोलीस गॅस गळती रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
“गॅस अत्यंत ज्वलनशील असल्याने कोणताही धोका पत्करता येणार नाही. जोपर्यंत यंत्रणा ‘क्लिअरन्स’ देत नाही, तोपर्यंत एक्सप्रेसवे बंद राहील.”
-महामार्ग सुरक्षा पथक
शक्य असल्यास आज एक्सप्रेसवेवरील प्रवास पूर्णपणे टाळावा. मुंबई किंवा पुण्याला जाणे अत्यंत गरजेचे असल्यास रेल्वे प्रवासाला प्राधान्य द्यावे. जुन्या महामार्गावरही मोठी कोंडी असल्याने प्रवासाचे नियोजन विचारपूर्वक करा.
