नागोठणे । महेंद्र म्हात्रे
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी, नागोठणे पोलीस ठाण्याच्या वतीने शहरात जोरदार ‘रूट मार्च’ काढण्यात आला. बुधवारी, ४ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५:३० ते ६:४० या वेळेत शहरातील संवेदनशील आणि मुख्य भागांतून हे संचलन करण्यात आले.
निवडणुकीच्या काळात नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये, या हेतूने हे संचलन आयोजित करण्यात आले होते. या रूट मार्चची सुरुवात नागोठणे पोलीस ठाण्यापासून झाली. त्यानंतर नुक्कड गल्ली, श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, कोळीवाडा, हुजरा मोहल्ला, के.एम.जी. विभाग, खुमाचा नाका आणि बाजारपेठ अशा प्रमुख परिसरांमध्ये पोलिसांनी संचलन करत परिस्थितीचा आढावा घेतला.
या रूट मार्चमध्ये नागोठणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी आणि पोलीस उपनिरीक्षक (PSI) नरेश थळकर यांच्यासह एकूण २ पोलीस अधिकारी, ४० पोलीस अंमलदार आणि ३० होमगार्ड सहभागी झाले होते.
निवडणूक काळात कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन याप्रसंगी पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले. पोलीस दलाच्या या संचलनामुळे नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण पाहायला मिळाले, तर समाजकंटकांवर जरब बसण्यास मदत होणार आहे.
