• Wed. Feb 11th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

अलिबाग काँग्रेसला खिंडार; वसीम कुर यांचा समर्थकांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश

ByEditor

Feb 5, 2026
सोगाव येथील मापगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच वसीम कुर व इतर शिवसेना पक्षात पक्षप्रवेश करतांना उपस्थित आमदार महेंद्र दळवी व इतर मान्यवर आणि कार्यकर्ते.

आमदार महेंद्र दळवींच्या उपस्थितीत सोगाव येथे पक्षप्रवेश; ‘शिंदे गटा’ची ताकद वाढली

सोगाव । अब्दुल सोगावकर
रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे वारे वाहू लागले असतानाच, अलिबाग तालुक्यात काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे. मापगावचे माजी उपसरपंच वसीम कुर यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह बुधवारी (४ फेब्रु.) शिवसेना (शिंदे गट) पक्षात जाहीर प्रवेश केला. आमदार महेंद्र दळवी यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले असून, या पक्षप्रवेशामुळे आवास जिल्हा परिषद मतदार संघात शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.

सोगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या या दिमाखदार सोहळ्याला आमदार महेंद्र दळवी, जिल्हा परिषदेचे उमेदवार दिलीप उर्फ छोटमशेठ भोईर प्रामुख्याने उपस्थित होते. वसीम कुर यांच्यासोबत मुद्स्सर कुर, किफायत कुर तसेच चोरोंडे येथील श्याम परब, जगदीश मल्हार, केतन परब व इतर कार्यकर्त्यांनी हाती ‘धनुष्यबाण’ घेतला. आमदार दळवी यांनी सर्वांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमदार महेंद्र दळवी म्हणाले, “सोगाव गावाने माझ्या जडणघडणीत नेहमीच मोलाची साथ दिली आहे. वसीम कुर यांच्यासारखे उमदे नेतृत्व पक्षात आल्याने दिलीप भोईर आणि पंचायत समितीच्या उमेदवार स्नेहा रुत यांच्या विजयाचा मार्ग आता अधिक सुकर झाला आहे. वसीम कुर यांचे सर्व समाजाशी असलेले वैयक्तिक संबंध पाहता, भविष्यात ते पंचायत समिती निवडणुकीत उतरल्यास सहज निवडून येतील, असा मला विश्वास आहे.”

“आमदार महेंद्र दळवी यांच्या कार्यपद्धतीवर आणि विकासकामांवर प्रेरित होऊन आम्ही हा निर्णय घेतला आहे. मापगाव आणि परिसरात अधिक विकासकामे व्हावीत, हाच आमचा उद्देश असून या निवडणुकीत दिलीप भोईर यांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्यासाठी आम्ही कंबर कसली आहे,” असे वसीम कुर यांनी यावेळी स्पष्ट केले.

या कार्यक्रमाला संतोष राऊत सर, जगदीश सावंत, संजय हडकर, प्रभाकर मोहिते, माजी सरपंच पप्या दळवी, बाबू कुर, इस्माईल कुर, उत्तम राऊत, मनोज काठे, स्नेहा रुत, अजित घरत यांसह शिघ्रे-मुरुड आणि सोगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थ, महिला व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!