• Wed. Feb 11th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

श्रीवर्धन पोलिसांचा रूट मार्च

ByEditor

Feb 5, 2026

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेची ग्वाही

श्रीवर्धन । अनिकेत मोहित
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026 शांततेत व सुरळीत पार पडाव्यात, तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने श्रीवर्धन पोलीस ठाण्याच्या वतीने शहर व पोलीस ठाण्याच्या हद्दीत रूट मार्च (पथसंचलन) काढण्यात आला.

पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप पाटील, प्रदीप राठोड, खरात मॅडम यांच्या नेतृत्वाखाली हा रूट मार्च पार पडला. या पथसंचलनात 35 पोलीस अंमलदार व 58 होमगार्ड सहभागी झाले होते.

यावेळी श्रीवर्धन एसटी स्टँड परिसरात दंगा काबू योजना (Riot Control Drill) राबविण्यात आली. शहरातील मुख्य रस्त्यांसह जसवली, आराठी मेटकर्णी, वाळवटी आदी संवेदनशील भागांमधून पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पायी चालत नागरिकांना सुरक्षिततेची ग्वाही दिली. तसेच समाजकंटकांवर वचक निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

शांतता व सुव्यवस्था राखणे, गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे आणि नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करणे, या उद्देशाने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात आली. यामध्ये कलम 168 अन्वये 60 जणांना नोटीस बजावण्यात आली असून, कलम 126 नुसार 42 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच 01 व्यक्तीवर कलम 128, 08 व्यक्तींवर कलम 129 अंतर्गत कारवाई करण्यात आली असून, 05 व्यक्तींवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे.

निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव असून तो शांततेत पार पाडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे व अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांनी यावेळी केले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!