• Tue. Feb 10th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

महाड: ‘एम्बायो’ कंपनीत भीषण आग; सुरक्षा नियमांचे तीनतेरा!

ByEditor

Feb 5, 2026

वेल्डिंगच्या ठिणगीमुळे केमिकलने घेतला पेट; दोन कामगार जखमी, जीवितहानी टळली

महाड । मिलिंद माने
महाड औद्योगिक वसाहतीमधील ‘एम्बायो’ या बल्कड्रग फार्मा कंपनीत गुरुवारी सायंकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीचे लोट आणि धुराचे लोट आकाशात उसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. सुदैवाने, अग्निशमन दलाने तातडीने धाव घेतल्याने मोठी जीवितहानी टळली असली, तरी या घटनेमुळे औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एम्बायो कंपनीच्या ‘इम्फ्यूअर’ विभागात गुरुवारी दुपारपासून मेंटेनन्सचे काम सुरू होते. वेल्डिंगच्या सहाय्याने नट-बोल्ट तोडण्याचे काम सुरू असताना सायंकाळी ६:४५ च्या सुमारास वेल्डिंगची ठिणगी खाली सांडलेल्या केमिकलवर पडली. रसायन असल्याने आगीने क्षणात रौद्र रूप धारण केले. आगीच्या ज्वाला आणि धुराचे काळे लोट पाहून औद्योगिक वसाहतीमधील इतर कंपन्यांमधील कामगारांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते.

आग लागताच कंपनीतील फायर सिस्टीम कार्यान्वित करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच महाड औद्योगिक वसाहत आणि महाड नगरपालिकेचे एकूण ४ अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. या आगीत सुदीप देबनाथ आणि शंतनू हे दोन कामगार जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती कंपनीचे प्रोडक्शन मॅनेजर सुभाष काटे यांनी दिली.

सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष?

या घटनेमुळे एम्बायो कंपनीतील सुरक्षा व्यवस्थेचे वाभाडे निघाले आहेत. रसायन विभागात वेल्डिंगसारखे जोखमीचे काम करताना आवश्यक ती खबरदारी का घेतली गेली नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे. कंपनी प्रशासनाकडून आग किरकोळ असल्याचे भासवले जात असले, तरी प्रत्यक्षदर्शींनी पाहिलेले आगीचे लोट भीषणतेची साक्ष देत होते. वेल्डिंगमुळेच आग लागल्याचे प्रशासनाने मान्य केल्याने, सुरक्षेच्या नियमांचे सर्रास उल्लंघन झाल्याची चर्चा कामगार वर्गात सुरू आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!