म्हसळा । वैभव कळस
म्हसळा तालुक्यातील २ जिल्हा परिषद गट आणि ४ पंचायत समिती गणांसाठी उद्या, ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या लोकशाहीच्या उत्सवासाठी संपूर्ण शासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, निवडणूक साहित्यासह कर्मचारी आज सकाळीच आपापल्या केंद्रांकडे रवाना झाले आहेत.
तालुक्यातील एकूण ६९ मतदान केंद्रांवर प्रशासनाने चोख व्यवस्था केली आहे. निवडणूक निर्वाचन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण प्रक्रिया राबवली जात आहे. मतदानाच्या सुव्यवस्थेसाठी १५ झोनल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, एकूण ४०० कर्मचारी प्रत्यक्ष निवडणूक कामात सहभागी आहेत.
चोख पोलीस बंदोबस्त मतदान प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामध्ये ४ पोलीस अधिकारी, ५० पोलीस कर्मचारी आणि ७३ होमगार्ड्सचा समावेश आहे. कोणत्याही अनुचित प्रकार टाळण्यासाठी संवेदनशील केंद्रांवर विशेष लक्ष दिले जाणार आहे.
महिन्याभराची मेहनत तहसीलदार सचिन खाडे यांच्या नेतृत्वाखालील १०० कर्मचाऱ्यांचे पथक गेल्या महिनाभरापासून अहोरात्र परिश्रम घेत आहे. मतदार याद्या अद्ययावत करण्यापासून ते ईव्हीएम (EVM) मशीनच्या तांत्रिक बाबी तपासण्यापर्यंतची सर्व तयारी पूर्ण झाली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मतदार राजाचा कौल कोणाला? उद्या होणाऱ्या या निवडणुकीत तालुक्यातील एकूण ४५,५३१ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील. सकाळी ९ वाजेपासूनच महसूल आणि पोलीस प्रशासनाचे कर्मचारी ईव्हीएम व इतर निवडणूक साहित्यासह केंद्रांकडे रवाना होताना दिसत होते. प्रशासनाने तयारी पूर्ण केली असून आता सर्वांचे लक्ष उद्या होणाऱ्या मतदानाकडे लागले आहे.

