इंधन दरवाढीसोबतच सिलेंडरची टंचाई; साठेबाजांवर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी
उरण | अनंत नारंगीकर
अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या संघर्षाचे पडसाद आता उरणमधील सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरात उमटू लागले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील अस्थिरतेमुळे महागाईने उच्चांक गाठला असतानाच, उरण तालुक्यात घरगुती गॅस सिलेंडरचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. वेळेवर सिलेंडर उपलब्ध होत नसल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले असून त्या हतबल झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
निर्यात ठप्प, शेतकरीही चिंतेत
युद्धजन्य परिस्थितीमुळे जेएनपीए (JNPA) बंदरातून होणारी कृषी मालाची निर्यात पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. विशेषतः कोकणचा राजा असलेला ‘हापूस’ आंबा परदेशात पाठवण्यात अडचणी येत असल्याने बागायतदार शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातच इंधन कंपन्यांनी घरगुती सिलेंडरच्या दरात ६० रुपये, तर व्यावसायिक सिलेंडरच्या दरात ११५ रुपयांची मोठी वाढ केल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.
गॅस टंचाईचा ग्रामीण भागातही फटका
उरण शहरासह ग्रामीण भागात सध्या स्वयंपाकघरातील गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. इंडियन ऑइल, भारत गॅस व इतर कंपन्यांकडून पुरवठा कमी होत असल्याचे सांगण्यात येत असले तरी, प्रत्यक्षात सिलेंडर कुठे गायब होत आहेत, असा सवाल नागरिक विचारत आहेत.
प्रशासनाकडून कडक कारवाईची अपेक्षा
बाजारात निर्माण झालेली ही टंचाई नैसर्गिक आहे की कृत्रिम, याची शंका नागरिकांना येत आहे. अनेक गॅस एजन्सी आणि व्यावसायिक साठेबाजी करत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी होत आहे.
प्रमुख मागण्या:
- गॅस एजन्सीकडे होणाऱ्या पुरवठ्याचा प्रशासनाने ‘लेखाजोखा’ तपासावा.
- व्यावसायिक वापरासाठी घरगुती सिलेंडरचा अवैध वापर करणाऱ्यांवर कारवाई करावी.
- साठेबाजी करणाऱ्या दोषींवर कडक कायदेशीर पाऊले उचलावीत.
- तालुक्यातील गॅस पुरवठा तातडीने सुरळीत करावा.
