• Sat. Mar 7th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

महाड मतदारसंघातील बस स्थानकांच्या कायापालटासाठी मंत्री भरतशेठ गोगावले सरसावले!

ByEditor

Mar 7, 2026

माणगावला स्वतंत्र आरटीओ केंद्राची मागणी; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी मुंबईत सविस्तर चर्चा

माणगाव | सलीम शेख
महाड विधानसभा मतदारसंघातील प्रवाशांच्या सोयीसाठी आणि दळणवळण यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी राज्याचे रोजगार हमी मंत्री ना. भरतशेठ गोगावले यांनी पुढाकार घेतला आहे. मतदारसंघातील महाड, माणगाव, पोलादपूर आणि इंदापूर येथील बस स्थानकांच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यासह, माणगाव येथे स्वतंत्र आरटीओ (RTO) पासिंग केंद्र सुरू करण्याची आग्रही मागणी त्यांनी केली आहे.

२८ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबई येथे परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक यांच्या निवासस्थानी झालेल्या विशेष बैठकीत ना. गोगावले यांनी या सर्व विषयांवर सविस्तर चर्चा केली.

बस स्थानकांचे होणार सुशोभीकरण

रायगड जिल्ह्याचे खंबीर नेतृत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ना. गोगावले यांनी बस स्थानकांमधील असुविधांकडे परिवहन मंत्र्यांचे लक्ष वेधले.

महाड: बस स्थानकाच्या दुरुस्ती आणि उन्नतीकरणासाठी तातडीने निधी देण्याची मागणी.

इंदापूर: येथील बस स्थानकाची जुनी इमारत पाडून त्याऐवजी सुसज्ज नवीन इमारत उभारण्याचा प्रस्ताव.

पोलादपूर: प्रवाशांच्या सुरक्षेसाठी २४ तास सुरक्षारक्षक आणि अत्याधुनिक नियंत्रण कक्ष (Control Room) उभारण्याची मागणी.

माणगाव: बस स्थानक परिसरात काँक्रीटीकरण करून प्रवाशांना चिखल व धुळीपासून दिलासा देण्याची सूचना.

माणगावला आरटीओ केंद्र झाल्यास ६ तालुक्यांना फायदा

सध्या महाड, पोलादपूर, माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन, तळा आणि रोहा या भागांतील वाहनधारकांना नोंदणी व पासिंगसाठी पेण येथे जावे लागते. हे अंतर जास्त असल्याने वेळ आणि पैशांचा मोठा अपव्यय होतो. माणगाव येथे पुरेशी जागा उपलब्ध असल्याने तिथे स्वतंत्र ‘आरटीओ पासिंग केंद्र’ सुरू करावे, अशी ठोस मागणी ना. गोगावले यांनी केली. हे केंद्र सुरू झाल्यास दक्षिण रायगडमधील हजारो वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मिनीडोअर धारकांच्या समस्यांवर लवकरच तोडगा

महाड व परिसरात मोठ्या प्रमाणात असलेल्या मिनी डोअर (टमटम) चालकांना परवाना आणि इतर प्रशासकीय अडचणींचा सामना करावा लागत आहे. या प्रश्नांवर शासन स्तरावर स्वतंत्र बैठक बोलावून सकारात्मक तोडगा काढण्याची विनंतीही ना. गोगावले यांनी यावेळी केली.

परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक यांनी या सर्व मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला असून, संबंधित विभागांना तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या जातील, असे आश्वासन दिले आहे. या पाठपुराव्यामुळे महाड मतदारसंघातील परिवहन सुविधांचा चेहरामोहरा बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!