कोलाड | विश्वास निकम
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग (NH-66) चौपदरीकरणाचे काम गेल्या १७ वर्षांपासून सुरू असून, आजही हे काम संथ गतीने सुरू असल्याचे चित्र आहे. विशेषतः आंबेवाडी (कोलाड) आणि खांब बाजारपेठेतील उड्डाणपुलांचे काम अद्यापही अर्धवट आहे. अशातच काम पूर्ण होण्यापूर्वीच टोल वसुलीची तयारी सुरू झाल्याने कोकणवासीयांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
लोकनेत्यांच्या आश्वासनांची ‘डेडलाईन’ फेल
महामार्गाचे काम वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींकडून सातत्याने पाहणी केली जाते आणि दरवर्षी नवनवीन तारखा (डेडलाईन) जाहीर केल्या जातात. मात्र, त्या डेडलाईन्स सातत्याने हुलकावणी देत आहेत. दुसरीकडे, महामार्गाचे काम शंभर टक्के पूर्ण झाल्याशिवाय टोल वसुली केली जाणार नाही, अशी ग्वाही राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत आणि महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली होती. असे असतानाही, काम पूर्ण नसताना टोल वसुलीच्या हालचाली सुरू झाल्याने, यामागे नेमका कोणाचा दबाव आहे, असा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडला आहे.

नागरिकांचे हाल आणि व्यापार्यांचे नुकसान
महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी अनेक व्यापाऱ्यांची दुकाने बुलडोजरच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आली. अनेकांचा उदरनिर्वाह हिरावला गेला, मात्र १७ वर्षे उलटूनही काम पूर्ण झालेले नाही. अर्धवट रस्ते, सांडपाण्याच्या गटारांचा अभाव आणि अपूर्ण पुलांमुळे आंबेवाडी आणि खांब बाजारपेठेत सण-उत्सवांच्या काळात वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे. तासनतास अडकून पडणाऱ्या प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या अर्धवट कामांमुळे वारंवार होणाऱ्या अपघातांत अनेकांचे बळी गेले आहेत, तरीही प्रशासनाचे दुर्लक्ष कायम आहे.
“टोल वसुली सुरू केल्यास तीव्र आंदोलन”
याबाबत सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत लोखंडे यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे. “खांब-सुकेळी टोल नाका तयार झाला असला तरी, मुख्य रस्त्याचे काम अद्याप बाकी आहे. आधी रस्ता पूर्ण करा, मगच टोलचा विचार करा. जर काम पूर्ण होण्याआधी टोल वसुली लादली, तर महामार्गावर तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा त्यांनी दिला आहे.
आगामी पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण होणार का, आणि टोल वसुलीच्या संदर्भात सरकार कोणती भूमिका घेते, याकडे संपूर्ण कोकणवासीयांचे लक्ष लागले आहे.
