• Tue. Mar 24th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

आईचा वारसा अन् स्वराजची जिद्द! ३६ कि.मी.चे ‘धरमतर ते गेटवे’ अंतर ९ तास ४९ मिनिटांत केले पार

ByEditor

Mar 24, 2026

अरबी समुद्रातील लाटांवर कोरले नाव; एकाच कुटुंबातील पाचव्या सदस्याची विक्रमी कामगिरी

उरण । विठ्ठल ममताबादे
जिद्द, चिकाटी आणि उपजत जलतरण कौशल्याच्या जोरावर उरणच्या स्वराज सोनाली संतोष पाटील या तरुण जलतरणपटूने अरबी समुद्रात नवा इतिहास रचला आहे. अथांग समुद्राचा गडद अंधार आणि लाटांशी झुंज देत स्वराजने धर्मतर ते गेटवे ऑफ इंडिया हे ३६ किलोमीटरचे आव्हानात्मक अंतर केवळ ९ तास ४९ मिनिटांत यशस्वीपणे पार केले.

स्वराजने मध्यरात्री ठीक २:०० वाजता धर्मतर जेटीवरून समुद्रात झेप घेऊन आपल्या या मोहिमेला सुरुवात केली. रात्रीचा काळोख, भरती-ओहोटीचे अनिश्चित प्रवाह, जेलीफिशचा धोका आणि मोठ्या जहाजांची वर्दळ अशा अनेक आव्हानांवर मात करत स्वराजने आपले सातत्य राखले. सकाळी ११ वाजून ४९ मिनिटांनी त्याने गेटवे ऑफ इंडियाचा किनारा गाठला.

आईचा २५ वर्षांपूर्वीचा वारसा जपला

स्वराजचे हे यश केवळ वैयक्तिक नसून, ते एका ‘जलतरणपटू कुटुंबाच्या’ दैदीप्यमान परंपरेचा भाग आहे. स्वराजला हा वारसा त्याची आई सोनाली संतोष पाटील यांच्याकडून मिळाला आहे. विशेष म्हणजे, २५ वर्षांपूर्वी सोनाली पाटील यांनीही याच मार्गावर पोहून आपली ओळख निर्माण केली होती. आईने पाहिलेले स्वप्न आज मुलाने पूर्ण केल्यामुळे पाटील कुटुंबाचा आनंद द्विगुणित झाला आहे.

ही मोहीम फत्ते करण्यापूर्वी स्वराजने टप्प्याटप्प्याने सराव केला होता. याआधी त्याने ‘मोरा ते गेटवे ऑफ इंडिया’ आणि ‘कासा खडक ते खांदेरी किल्ला’ हे जलमार्ग यशस्वीपणे पार केले होते. या अनुभवामुळेच त्याला ३६ कि.मी.च्या महा-मोहिमेसाठी आत्मविश्वास मिळाला. त्याला अनुभवी प्रशिक्षक मामा हितेश पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले, तर मामा संतोष पाटील, जयेश पाटील आणि भाऊ राज पाटील यांनी सतत प्रोत्साहन दिले.

‘समुद्रपुत्र’ पाटील कुटुंब

एकाच कुटुंबातील आई, आजोबा, भाऊ, मामा आणि आता स्वतः स्वराज अशा सर्वांनीच समुद्रातील विविध मोहिमा फत्ते केल्या आहेत. त्यामुळे उरणमध्ये या कुटुंबाची ओळख आता खऱ्या अर्थाने ‘समुद्रपुत्र’ म्हणून निर्माण झाली आहे. गेटवे ऑफ इंडियावर पोहोचताच स्वराजचे जंगी स्वागत करण्यात आले.

“आईने २५ वर्षांपूर्वी जे स्वप्न पाहिले होते, ते आज मी पूर्ण करू शकलो याचा मला सार्थ अभिमान आहे,” अशा भावना स्वराजने विजयानंतर व्यक्त केल्या.

या ऐतिहासिक कामगिरीमुळे आगामी काळात जागतिक स्तरावरील ‘इंग्लिश चॅनेल’ (English Channel) सारख्या अतिशय कठीण स्पर्धांमध्ये उतरण्याचा स्वराजचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!