• Tue. Mar 24th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

पोयनाड येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न; ७० हून अधिक नागरिकांनी घेतला लाभ

ByEditor

Mar 24, 2026

श्रीराम मंदिर ट्रस्ट, उज्ज्वल भविष्य आणि माणुसकी प्रतिष्ठानचा संयुक्त उपक्रम; तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची तपासणी

पोयनाड । प्रतिनिधी
ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने, श्रीराम मंदिर ट्रस्ट (पोयनाड), उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था (अलिबाग) आणि माणुसकी प्रतिष्ठान (जीतनगर, वायशेत) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात पार पडले. रविवार, २२ मार्च रोजी पोयनाड येथील रामआळीतील श्रीराम मंदिर पटांगणावर झालेल्या या शिबिरास परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

दिवसभरात ७० हून अधिक लाभार्थ्यांनी या शिबिरात सहभाग नोंदवून आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली. यामध्ये प्रामुख्याने रक्तदाब, मधुमेह (Diabetes), ईसीजी (ECG), नेत्ररोग, कर्करोग, हृदयरोग तसेच अस्थिरोगाशी संबंधित विविध तपासण्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली करण्यात आल्या. तपासणीनंतर गरजेनुसार रुग्णांना मोफत औषधोपचारांचेही वाटप करण्यात आले.

या शिबिरात डॉ. राजाराम हुलवान, डॉ. नितीन गांधी, डॉ. उज्ज्वला चंदनशिव, डॉ. गौरव पाटील, डॉ. श्रेयस सोमनाथ आणि आस्था नेत्रालयाच्या संपूर्ण टीमने रुग्णांची बारकाईने तपासणी केली. ज्या रुग्णांना पुढील विशेष उपचारांची आवश्यकता आहे, त्यांना वाशी (नवी मुंबई) येथील माधव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल तसेच आस्था नेत्रालय (अलिबाग) येथे संदर्भीय सेवांसाठी मार्गदर्शित करण्यात आले.

सदर सामाजिक उपक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीराम मंदिर ट्रस्टचे विश्वस्त व सदस्य सुनील पाटील, रमेश तावडे, दीपक चवरकर, किशोर तावडे, देवेंद्र केळुस्कर, दिलीप कारेकर, विजेंद्र तावडे, अजय टेमकर, राजेश जाधव, चंद्रशेखर मसुरकर, नंदकुमार पाटील, आदित्य कडू, अंकिता चवरकर, मनीषा टेमकर आणि लीना चवरकर यांनी विशेष परिश्रम घेतले. आरोग्य सेवा घरापर्यंत पोहोचवणाऱ्या या उपक्रमाचे पोयनाड परिसरातील नागरिकांकडून विशेष कौतुक होत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!