• Fri. Mar 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

श्रीवर्धनमध्ये मासेमारी ठप्प! निसर्ग, डिझेल दरवाढ आणि मासळी दुष्काळाचे तिहेरी संकट

ByEditor

Mar 27, 2026

श्रीवर्धन । संदेश घोलप
कोकण किनारपट्टीवरील श्रीवर्धन तालुक्यात सध्या मासेमारी व्यवसाय अभूतपूर्व संकटात सापडला आहे. समुद्रातील प्रतिकूल हवामान, कडाडलेले डिझेल दर आणि मासळीची घटलेली आवक अशा ‘तिहेरी’ संकटामुळे स्थानिक मच्छीमार हतबल झाले असून, किनारपट्टीवर ‘मासळी दुष्काळ’सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

समुद्राचे रौद्र रूप आणि निसर्गाचा फटका

गेल्या काही दिवसांपासून उत्तर ते दक्षिण दिशेने वाहणारे तीव्र वारे आणि समुद्रातील वाढलेल्या करंटमुळे परिस्थिती अत्यंत धोकादायक बनली आहे. उंच उसळणाऱ्या लाटांमुळे बोटी खोल समुद्रात नेणे अशक्य झाले आहे. मच्छीमारांच्या मते, सध्याच्या स्थितीत समुद्रात जाणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखे असल्याने बहुतांश मच्छीमारांनी आपल्या बोटी बंदरातच उभ्या केल्या आहेत.

डिझेल दरवाढीचा ‘दणका’

आखाती देशांतील तणावपूर्ण परिस्थितीचा थेट फटका स्थानिक मच्छीमारांना बसला आहे. डिझेलच्या दरात झालेल्या विक्रमी वाढीमुळे मच्छीमारीचा खर्च आवाक्याबाहेर गेला आहे. “वाढत्या खर्चामुळे समुद्रात जाणे आता परवडेनासे झाले आहे, आधीच तोट्यात असलेला व्यवसाय आता पूर्णपणे कोलमडला आहे,” अशी भावना मच्छीमार व्यक्त करत आहेत.

बाजारात मासळीचा तुटवडा; पर्यटनावर परिणाम

सर्वात गंभीर बाब म्हणजे समुद्रात जाळी टाकूनही अपेक्षित मासळी मिळत नाहीये. यामुळे स्थानिक बाजारपेठेत ताज्या मासळीची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. श्रीवर्धन हे पर्यटनासाठी प्रसिद्ध असून येथील ‘ताजी मासळी’ हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण असते. मात्र, सध्या मासळी मिळत नसल्याने हॉटेल व्यावसायिक आणि पर्यटन क्षेत्रावरही याचे सावट पसरले आहे.

“सध्या समुद्रात वारे आणि लाटांचे प्रमाण प्रचंड आहे. जीवावर उदार होऊन गेलो तरी मासळी मिळत नाही. त्यात डिझेलच्या दरवाढीमुळे आर्थिक गणित कोलमडले आहे. सरकारने तातडीने डिझेल अनुदान आणि आर्थिक मदत दिली नाही, तर मच्छीमार कुटुंबांवर उपासमारीची वेळ येईल.”
-जीवन धंबा, स्थानिक मच्छीमार

शासनाकडे मदतीची आर्त हाक

हजारो कुटुंबांची उपजीविका मासेमारीवर अवलंबून असल्याने या संकटामुळे मोठे आर्थिक आणि सामाजिक प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. शासनाने या प्रकरणी तातडीने हस्तक्षेप करून डिझेल अनुदान आणि विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी श्रीवर्धनमधील मच्छीमारांनी केली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!