• Mon. May 11th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

ओव्हरलोड ट्रेलरचा कहर! उरणमध्ये ओव्हरलोड ट्रेलरने रिक्षा चिरडली; मुलीच्या लग्नापूर्वीच पित्याचा दुर्दैवी अंत

ByEditor

Mar 27, 2026

उरण । घनःश्याम कडू
जेएनपीटी पोलीस ठाण्याजवळील पुलाखाली गुरुवारी सायंकाळच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. ओव्हरलोड असलेल्या कंटेनर ट्रेलरने रिक्षाला दिलेल्या जोराच्या धडकेत जसखार येथील रिक्षाचालक किसन सुकीर ठाकूर यांचा जागीच चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे, पुढील महिन्यातच ठाकूर यांच्या मुलीचे लग्न होते, अशातच काळाने घातलेल्या या घालामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, पुलावरून उतरत असताना एका भरधाव कंटेनर ट्रेलरवरील चालकाचा ताबा सुटला. या ट्रेलरने पुढे जात असलेल्या रिक्षाला इतकी भीषण धडक दिली की, रिक्षा समोर उभ्या असलेल्या दुसऱ्या एका ट्रेलरखाली घुसून पूर्णपणे चिरडली गेली. अपघाताचे स्वरूप इतके भयानक होते की रिक्षाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. सुदैवाने रिक्षामध्ये इतर प्रवासी नसल्याने मोठी जीवितहानी टळली, मात्र चालक किसन ठाकूर यांना प्राण गमवावे लागले.

ओव्हरलोडिंग आणि थकवा ठरतोय जीवघेणा?

या अपघातामागे ट्रेलरवर क्षमतेपेक्षा जास्त (दोन कंटेनर) लोड असल्याचे प्राथमिक कारण समोर येत आहे. बंदरातून नियमांचे उल्लंघन करून ओव्हरलोड गाड्या सोडल्या जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. तसेच, अनेक चालक तासन्तास विश्रांतीशिवाय वाहन चालवत असल्याने थकव्यामुळे त्यांचे नियंत्रण सुटत आहे. अनेक चालकांकडे वैध परवाना नसणे किंवा बोगस परवाने वापरले जाणे, ही बाबही आता ऐरणीवर आली आहे.

न्हावा शेवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक सुर्वे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर ट्रेलर चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. संबंधित ट्रान्सपोर्ट मालक परराज्यातील असल्याने त्याच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मालक हजर झाल्यानंतर अधिक माहिती स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.

पत्रकार संघ आक्रमक

उरणमधील या वाढत्या अपघातांच्या मालिकेवर ‘उरण तालुका मराठी पत्रकार संघ’ आता आवाज उठवणार आहे. दोषींवर कठोर कारवाई आणि ओव्हरलोडिंग रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी संघाचे अध्यक्ष घन:श्याम कडू यांनी केली आहे.

वाहनांची नियमित तपासणी आणि चालकांच्या परवान्यांची कडक पडताळणी व्हावी, प्रत्येक ट्रेलरवर ‘क्लीनर’ची सक्ती करण्यात यावी, बंदरातून बाहेर पडणाऱ्या ओव्हरलोड गाड्यांवर कायमस्वरूपी बंदी घालावी या प्रमुख मागण्या उरणमधील संतप्त नागरिकांनी केल्या आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!