नागोठणे (विशेष प्रतिनिधी)
रिलायन्स कंपनीच्या नागोठणे प्रकल्पांतर्गत नव्याने सुरू करण्यात आलेल्या बायोगॅस प्रकल्पामुळे परिसरातील ग्रामस्थांचे जगणे असह्य झाले आहे. ‘टाकाऊतून टिकाऊ ऊर्जा’ निर्मितीच्या संकल्पनेतून उभारलेला हा प्रकल्प प्रत्यक्षात गावकऱ्यांच्या आरोग्यासाठी घातक ठरत असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
या प्रकल्पातून येणाऱ्या तीव्र दुर्गंधीचा सर्वाधिक फटका शेजारील गावांना बसत असून, विशेषतः सकाळ आणि संध्याकाळच्या वेळी वासाची तीव्रता प्रचंड वाढत असल्याने घरात बसणेही कठीण झाले आहे. या दुर्गंधीमुळे नागरिकांना डोकेदुखी, मळमळ, उलट्या आणि श्वसनाचे त्रास जाणवू लागले आहेत. बायोगॅस निर्मितीनंतर उरलेली मळी (Slurry) उघड्यावर राहत असल्याने त्यातून मिथेन आणि हायड्रोजन सल्फाईडसारख्या घातक वायूंचे उत्सर्जन होत असल्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
या दुर्गंधीमुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अनेक नागरिकांना आपल्या घराचे दरवाजे आणि खिडक्या दिवसभर बंद ठेवाव्या लागत आहेत. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना डोकेदुखी, मळमळ, उलट्या होणे, घशात खवखव आणि श्वास घेण्यास त्रास अशा तक्रारी जाणवत आहेत. काही नागरिकांनी डोळ्यांची जळजळ आणि अस्वस्थता जाणवत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. विशेष म्हणजे, शिहू-नागोठणे मार्गावरून प्रवास करताना प्रवाशांना नाकाला रुमाल लावल्याशिवाय जाता येत नाही. मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना देखील या दुर्गंधीचा तीव्र त्रास सहन करावा लागत आहे. सार्वजनिक रस्त्यावर अशा प्रकारचा वास येणे ही अत्यंत चिंताजनक बाब असून, भविष्यात यामुळे सार्वजनिक आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे.
ग्रामस्थांच्या मनात या प्रकल्पाबाबत गंभीर शंका निर्माण झाल्या असून या प्रकल्पासाठी रीतसर जनसुनावणी घेण्यात आली होती का? तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (MPCB) नियमांचे काटेकोर पालन झाले आहे का? असे सवाल आता उपस्थित केले जात आहेत. सबंधित CBG प्रकल्पाची तात्काळ संयुक्त व सखोल तपासणी करण्यात यावी, हवेचे नमुने (Air Quality Monitoring) घेऊन वैज्ञानिक अहवाल सादर करण्यात यावा, दुर्गंधी नियंत्रणासाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रणेची कार्यक्षमता तपासण्यात यावी अशी मागणी त्रस्त नागरिकांकडून केली जात आहे.
जर कंपनी हा प्रकल्प सुरक्षित असल्याचा दावा करत असेल, तर त्यांनी ग्रामस्थांच्या आरोग्याची जबाबदारी घेऊन प्रत्येक नागरिकाचा किमान तीन कोटी रुपयांचा आरोग्य व टर्म विमा उतरवावा, अशी आक्रमक मागणीही आता जोर धरत आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
