माणगाव | सलीम शेख
तीन महिने अहोरात्र कष्ट उपसून, कर्ज काढून आशेच्या धाग्यावर उभी केलेली शेती आज डोळ्यांदेखत उद्ध्वस्त होताना पाहण्याची वेळ माणगाव तालुक्यातील कलिंगड उत्पादकांवर आली आहे. जागतिक युद्धाची झळ थेट कोकणातील बांधापर्यंत पोहोचली असून, परदेशी निर्यात थांबल्याने आणि स्थानिक बाजारपेठ कोसळल्याने शेतकरी पूर्णपणे कोलमडला आहे.
निर्यातक्षम ‘सुप्रीम’ वाणाला मोठा फटका

तालुक्यातील न्हावे गावचे शेतकरी संजय तेटगुरे यांची व्यथा आज हजारो शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करत आहे. गेल्या १२ वर्षांपासून कलिंगड शेती करणाऱ्या तेटगुरे यांनी यंदा ६ एकर जमीन भाड्याने घेऊन ‘सुप्रीम’ या उच्च दर्जाच्या वाणाची लागवड केली होती. परदेशात मोठी मागणी असलेल्या या पिकासाठी त्यांनी बियाणे, मशागत आणि मजुरीवर सुमारे साडेचार लाख रुपयांचा खर्च केला. मात्र, ऐन कापणीच्या हंगामात युद्ध भडकल्याने निर्यात पूर्णतः बंद झाली.
केवळ ‘सुप्रीम’च नव्हे, तर ‘गोल्डन’, ‘सिंबा’, ‘कृती’ आणि ‘शुगर बेबी’ अशा विविध वाणांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांचीही अवस्था बिकट आहे. दरवर्षी ८ ते १० हजार रुपये टन दराने विकले जाणारे कलिंगड यंदा शेतातच पडून सडत आहे.

निसर्गाचाही कोप; ८०० हेक्टरवरील पीक संकटात
माणगाव तालुक्यात सुमारे ८०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कलिंगडाची लागवड झाली आहे. मुंबई, वाशी, पुणे आणि परदेशातील बाजारपेठा गाजवणारा हा तालुका आता हतबल झाला आहे. निर्यात बंदीसोबतच कडक उन्हामुळे उरलीसरली फळेही करपून पिवळी पडली आहेत. व्यापारी फिरकेनासे झाले आहेत, त्यामुळे शेतात कलिंगडांचे ढीग साचले आहेत.
“दरवर्षी दोन-तीन लाख रुपये हाती उरायचे, यंदा साधे खर्च केलेले पैसेही निघाले नाहीत. आता वर्षभर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा आणि कर्ज कसे फेडायचे?” — संजय तेटगुरे, बाधित शेतकरी
विमा संरक्षणाचा अभाव आणि शासनाची उदासीनता
कोकणातील भात, आंबा, काजू या पिकांना शासनाकडून विमा संरक्षण दिले जाते, मात्र कलिंगडासारख्या नगदी पिकाला कोणतेही विमा कवच नाही. त्यामुळे नैसर्गिक किंवा जागतिक संकटात शेतकरी पूर्णपणे वाऱ्यावर सोडला जातो. या संकटकाळात शासनाने तातडीने पंचनामे करून मदत जाहीर करावी, अशी मागणी संतप्त शेतकरी करत आहेत.
माणगाव तालुक्यातील रब्बी हंगामाची स्थिती (हेक्टरमध्ये):
- कलिंगड: ८०० हे.
- वाल: ७९७ हे.
- कारली: ११३.७० हे.
- चवळी: १३९.५८ हे.
