प्रशासकीय अनास्थेमुळे पर्यटकांचे हाल; स्वच्छतागृहाअभावी महिला पर्यटकांची कुचंबणा
श्रीवर्धन । संदेश घोलप
आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘ब्ल्यू फ्लॅग’ मानांकन मिळाल्याचा अभिमान मिरवणाऱ्या श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यावर मूलभूत सुविधांचा पुरता बोजवारा उडाला आहे. नगरपरिषदेने सुमारे ३५ लाख रुपये खर्चून उभारलेले अत्याधुनिक स्वच्छतागृह आणि स्नानगृह उद्घाटनानंतरही गेल्या चार महिन्यांपासून बंद असल्याने पर्यटकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. “ब्ल्यू फ्लॅगचा दर्जा केवळ कागदावरच आहे का?” असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
थाटामाटात उद्घाटन, पण वापराविना कुलूप
काही महिन्यांपूर्वी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे आणि खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते या सुविधेचे उद्घाटन मोठ्या थाटामाटात करण्यात आले होते. मात्र, रिबीन कापल्यानंतर हे स्वच्छतागृह पर्यटकांसाठी कधी उघडलेच नाही. कोकणातील महत्त्वाचे पर्यटन केंद्र असल्याने येथे शनिवार-रविवार हजारो पर्यटक येतात. मात्र, ही सुविधा बंद असल्याने महिला व बालकांची मोठी गैरसोय होत आहे.
गैरसोयींचा पाढा
श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांना सध्या भीषण समस्यांचा सामना करावा लागत आहे. ३५ लाखांचे स्वच्छतागृह बंद असल्याने उद्भवलेली परिस्थिती भीषण आहे. ‘ब्ल्यू फ्लॅग’चा दर्जा असलेल्या किनाऱ्यावर स्वच्छतागृह बंद असल्याने पर्यटकांना, विशेषतः महिला व बालकांना नैसर्गिक विधींसाठी उघड्यावर जावे लागत आहे. यामुळे परिसरात कमालीची दुर्गंधी पसरली असून, स्वच्छतेच्या दाव्यांचा पुरता फज्जा उडाला आहे.
समुद्रस्नानाचा आनंद घेतल्यानंतर कपडे बदलण्यासाठी (Changing Rooms) कोणतीही सरकारी व्यवस्था उपलब्ध नाही. परिणामी, पर्यटकांना नाईलाजास्तव जवळच्या खासगी हॉटेल्स किंवा रिसॉर्ट्सचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. यामुळे पर्यटकांच्या खिशाला नाहक आर्थिक फटका बसत आहे.
लाखो रुपये खर्चून उभारलेली ही वास्तू मागील चार महिन्यांपासून रामभरोसे आहे. सुरक्षारक्षक किंवा देखभालीसाठी कर्मचारी नसल्याचा फायदा घेत काही समाजकंटकांनी या नवीन इमारतीची तोडफोड केली आहे. खिडक्यांच्या काचा आणि अंतर्गत साहित्याचे नुकसान झाल्याने शासकीय निधीचा अक्षरशः अपव्यय होत असल्याचे चित्र दिसत आहे.
‘ब्ल्यू फ्लॅग’ निकषांची पायमल्ली?
स्वच्छता, पर्यावरण व्यवस्थापन आणि मूलभूत सुविधा या निकषांच्या आधारेच आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘ब्ल्यू फ्लॅग’ प्रमाणपत्र दिले जाते. मात्र, श्रीवर्धनमध्ये याच निकषांची पायमल्ली होताना दिसत आहे. सुविधा बंद असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून समुद्रकिनाऱ्याच्या स्वच्छतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तातडीने हे स्वच्छतागृह सुरू करून त्याची कायमस्वरूपी देखभाल न केल्यास, श्रीवर्धनचा ‘ब्ल्यू फ्लॅग’चा दर्जा केवळ नावापुरताच उरेल, असा इशारा स्थानिक नागरिक आणि पर्यटकांनी दिला आहे.
