उरण । घनःश्याम कडू
उरण तालुक्यातील गोदामांना आग लागण्याच्या घटनांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. गव्हाणफाटा येथील जेडब्ल्यूआर गोदामाच्या आगीची घटना ताजी असतानाच, आज (गुरुवारी) सकाळी ९:३० च्या सुमारास भेंडखळ गावाजवळील ‘कॉनएक्स CFS’ (Conex CFS) मध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणावर मालाचे नुकसान झाले आहे.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि सिव्हिल डिफेन्सच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग अधिक पसरण्यापूर्वीच आटोक्यात आणली. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही, मात्र शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
दोन दिवसांपूर्वीच गव्हाणफाटा येथील जेडब्ल्यूआर गोदामाला मोठी आग लागली होती. त्यानंतर अवघ्या ४८ तासांत दुसरी घटना घडल्याने उरण तालुक्यातील सीएफएस आणि गोदामांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
तालुक्यात अनेक ठिकाणी अनधिकृतरीत्या गोदामांचे जाळे पसरले आहे. या गोदामांमध्ये अनेक ठिकाणी आग विझवण्यासाठी आवश्यक उपकरणे केवळ नावापुरतीच आहेत. गोदामांच्या बांधकामात आणि माल साठवणुकीत नियमांना हरताळ फासला जात असल्याची चर्चा आहे. वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे स्थानिक प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
“तालुक्यातील बेकायदेशीर गोदामांवर प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी आणि सर्व सीएफएसचे फायर ऑडिट बंधनकारक करावे, अन्यथा भविष्यात मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे,” अशी मागणी उरणमधील संतप्त नागरिकांकडून होत आहे.
