खालापूर | मनोज कळमकर
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील डोंगरगाव आणि कुसगाव हद्दीत पुलाचे शटरिंग काढणे व रंगकामाचे तातडीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी गुरुवारी आणि शुक्रवारी द्रुतगती मार्गावरील वाहतूक ठराविक वेळेत पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) दिली आहे.
वाहतुकीतील बदलाचा तपशील:
- २३ एप्रिल २०२६ (मुंबईकडे जाणारी वाहतूक): दुपारी १२:०० ते ३:०० या वेळेत मुंबईकडे जाणारी सर्व वाहने पूर्णपणे बंद राहतील. ही वाहतूक किवळे, देहूरोड आणि तळेगाव मार्गे राष्ट्रीय महामार्ग ४८ (जुना मुंबई-पुणे मार्ग) वर वळवण्यात येईल. त्यानंतर ही वाहने कुसगाव टोल प्लाझा येथून पुन्हा द्रुतगती मार्गावर प्रवेश करू शकतील.
- २४ एप्रिल २०२६ (पुण्याकडे जाणारी वाहतूक): दुपारी १२:०० ते ३:०० या वेळेत पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद असेल. सर्व वाहने कुसगाव टोल प्लाझा येथून राष्ट्रीय महामार्ग ४८ वर वळवण्यात येतील. त्यानंतर देहू रोड व किवळे मार्गे ही वाहने पुण्याकडे मार्गस्थ होतील.
प्रशासनाचे आवाहन
कामाच्या कालावधीत महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वाहनचालकांनी प्रवासाचे योग्य नियोजन करावे आणि शक्य असल्यास पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
मदतीसाठी येथे संपर्क साधा: प्रवासादरम्यान कोणतीही अडचण आल्यास किंवा आपत्कालीन स्थितीत मदतीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे:
- नियंत्रण कक्ष: ९८२२४९८२२४
- महामार्ग पोलीस विभाग: ९८३३४९८३३४
