• Wed. Apr 22nd, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

घरगुती खर्चाच्या वादातून गर्भवती महिलेची आत्महत्या; तरणखोपमध्ये हळहळ

ByEditor

Apr 22, 2026

किरकोळ वादातून घेतले टोकाचे पाऊल, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

रायगड । अमुलकुमार जैन
पेण तालुक्यातील तरणखोप येथे घरगुती खर्चावरून झालेल्या वादातून एका चार महिन्यांच्या गर्भवती महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली आहे. श्रीदेवी चंद्रकांत पोले असे मयत महिलेचे नाव असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी श्रीदेवी पोले या आपल्या राहत्या घरी नेहमीप्रमाणे कुटुंबीयांसोबत गप्पा मारत होत्या. दैनंदिन घरगुती कामकाज आणि सामान्य चर्चा सुरू असतानाच त्याच दिवशी संध्याकाळी त्या शेजारच्या मुलीसोबत मंगळवारच्या बाजारात गेल्या होत्या. बाजारातून परतल्यानंतर रात्री घरी घरखर्च आणि आर्थिक व्यवहारांबाबत कुटुंबात चर्चा सुरू झाली. या चर्चेदरम्यान किरकोळ कारणावरून वाद निर्माण झाला आणि घरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

या वादानंतर काही वेळाने श्रीदेवी बाथरूममध्ये गेल्या. बराच वेळ झाला तरी त्या बाहेर न आल्याने कुटुंबीयांना शंका आली. फिर्यादी चंद्रकांत जाधवराव पोले (रा. सुम ठाणा, गंगा हिवरगा, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर, सध्या राहणार तरणखोप, तालुका पेण) यांनी बाथरूमचा दरवाजा जोरात ढकलून उघडला असता आत धक्कादायक दृश्य दिसले. श्रीदेवी यांनी बाथरूममधील कपडे ठेवण्याच्या पाईपला हिरव्या रंगाच्या ओढणीने गळफास घेतल्याचे दिसून आले.
ही घटना पाहून कुटुंबीयांनी तत्काळ आरडाओरड करत मदतीसाठी धाव घेतली. श्रीदेवी यांना तात्काळ पेण येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. प्राथमिक माहितीनुसार, त्या चार महिन्यांच्या गर्भवती होत्या, त्यामुळे या घटनेने केवळ कुटुंबालाच नव्हे तर संपूर्ण परिसराला मोठा धक्का बसला आहे.

या दुर्दैवी घटनेनंतर मृतदेह पुढील शवविच्छेदनासाठी अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. दरम्यान, पेण पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. घरगुती वादातून घेतलेल्या या टोकाच्या निर्णयामुळे एक कुटुंब उद्ध्वस्त झाले असून, तरणखोप परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!