• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

घटनेला २४ तास उलटून गेले तरी मारेकरी अद्याप फरार!

ByEditor

Aug 22, 2023

रेल्वे गेटमन खून प्रकरणाचा छडा लावण्यासाठी ८ विशेष पोलीस पथके थैनात

शशिकांत मोरे
धाटाव :
कोकण रेल्वे मार्गावरील कोलाड जवळील तिसे गावाच्या रेल्वे फाटकावर गेटमन म्हणुन काम करणारे चंद्रकांत कांबळे यांची भरदुपारी अज्ञात मारेकऱ्याने डोक्यात गोळी घालून निर्घृण हत्या केली. या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

रेल्वे कामगार चंद्रकांत कांबळे यांची अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने हत्या करून अज्ञात खुनी इसमाने घटनास्थळावरून पलायन केले. दरम्यान या घटनेला २४ तास उलटून गेले तरी खुनी व्यक्तीचा थांगपत्ता लागत नाही. फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी व खुनाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली असून जिल्हा पोलिस प्रशासनाकडून ८ विशेष पोलीस पथक थैनात करण्यात आले आहेत. या घटनेच्या पार्शवभूमीर कोलाड बाजारपेठ आज बंद ठेवण्यात आली होती. रोहा तालुक्यातील कोलाड जवळील तिसे गावाच्या रेल्वे फाटकावर सुरक्षा म्हणुन रुजू असलेले चंद्रकांत कांबळे (रा. पाले खुर्द ता. रोहा) हे आपले कर्तव्य बजावत असताना सोमवारी ( ता. २१) रोजी दुपारी २ वा.च्या सुमारास अज्ञात मारेकऱ्याने त्यांची गोळी झाडून निर्घृण हत्या केली. या घटनेचे वृत्त समजताच अप्पर पोलीस अधीक्षक अतुलकुमार झेंडे यांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीची धरपकड करण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लावली आहे. अज्ञात आरोपीने चंद्रकांत कांबळे यांचा खून करण्यापूर्वी पूर्व नियोजित कट रचला असून ते ड्युटीवर एकटेच असतात तसेच ज्यावेळी तिसे रेल्वे फाटकावर गावाकऱ्यांची वर्दळ नसते अशा वेळेतच त्यांचा ‘गेम’ करून आपला हेतू साध्य करण्याचा ‘मास्टर प्लॅन’ तयार करून अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने कांबळे यांचा खून करण्यात आला आहे. कांबळे हे आंबेडकरी चळवळीतील धडाडीचे सक्रिय कार्यकर्ते होते. नुकत्याच झालेल्या रेल्वे संघटनेच्या निवडणुकीत त्यांनी आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले होते. पूर्व वैम्यनस्यातून त्यांची हत्या करण्यात आली असावी अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान, या घटनेनंतर अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन खुनाचा छडा लावण्यासाठी फॉरेन्सिक टीम, डॉग स्कॉड, बीडीडीएस टीम, फिंगर एक्सपर्ट टीम या सर्व टीमला पाचारण करून त्यांच्या मार्फत घटनास्थळी तपासणी केली आहे व ८ विशेष पोलीस पथकांची नेमणूक करून सर्व यंत्रणा कामाला लागली आहेत. दरम्यान, या घटनेचा बौध्द समाज व बहुजन समाज बांधवांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. या दुर्देवी घटनेत आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्याची हत्या झाल्याच्या निषेधार्थ येथील व्यापारी बांधवांनी आज दिवसभर बाजारपेठ बंद ठेवली होती.

चंद्रकांत कांबळे यांचा मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा आंबेडकरी नेत्यांनी घेतल्याने पोलीस प्रशासन मारेकराला शोधून काढतात का, नेमकी काय भूमिका घेतली जाते? याकडे जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले आहे.

चंद्रकांत कांबळे हे आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते होते. तसेच ते कोकण रेल्वे कर्मचारी संघटनेवर पदाधिकारी म्हणुन काम करत होते. तसेच कोलाड विभाग बौध्द समाज कार्याध्यक्ष म्हणुन काम करीत होते. या घटनेची सखोल चौकशी करून आरोपीला बेड्या ठोकण्यात याव्या.

राकेश कांबळे.
सरपंच, ग्रामपंचायत तिसे.

चंद्रकांत कांबळे यांच्या मारेकर्‍याला जोपर्यंत अटक करत नाहीत, तोपर्यंत आम्ही मयत कांबळे यांचा मृतदेह ताब्यात घेणार नाही. आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्याची अशी दिवसाढवळ्या हत्या व्हावी हे भयानक आहे. फरार मारेकऱ्याचा शोध लागलाच पाहिजे.

-भाई जाधव
अध्यक्ष, दलीत पँथर युथ महाराष्ट्र

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!