राजेश बाष्टे
अलिबाग : रायगड जिल्हा व अलिबाग बार असोसिएशनच्यावतीने ज्येष्ठ विधिज्ञ कै. दत्ताजीराव खानविलकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कायदेविषयक व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (१९ ऑगस्ट) ज्येष्ठ वकील अॅड. एम.एम. पारकर यांनी या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफले.
‘मी अनुभवलेली खानविलकर भाऊ यांची वकीली’ या विषयावर बोलताना अॅड. पारकर यांनी भाऊ खानविलकर यांची कारकीर्द, त्यांच्या आठवणी आणि त्यांनी चालविलेले महत्त्वाचे खटले यावर प्रकाश टाकला. या व्याख्यानाला अलिबाग, पेण न्यायालयातील वकीलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नवीन वकीलांना योग्य मार्गदर्शन व्हावे याकरिता कै. दत्ताजीराव खानविलकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त १५ मार्च २०२३ ते १५ मार्च २०२४ या कालावधीत ही कायदेविषयक व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये वर्षभरात चार ते पाच मार्गदर्शनपर व्याख्याने वकीलांसाठी घेण्यात येणार आहेत अशी माहिती बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. प्रसाद पाटील यांनी दिली.
ज्येष्ठ वकील अॅड. डी. एन. जोशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला रायगड जिल्हा व अलिबाग बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. प्रसाद पाटील, उपाध्यक्ष अॅड. अनंत पाटील, सचिव अॅड. अमित देशमुख यांच्यासह कार्यकारिणीचे पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.