माजी आमदार मनोहर भोईर यांची यशस्वी मध्यस्थी; तीन तरुणांना नोकरी
वैशाली कडू
उरण : उरण विधानसभा मतदारसंघातील खालापूर तालुक्यातील रसायनी पाताळगंगा एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रातील कॅस्ट्रोल कंपनीच्या व्यवस्थापनाविरुद्ध गेले सहा दिवस केरे गावातील प्रकल्पग्रस्त तरुण हे उपोषणाला बसले होते. प्रकल्पग्रस्त तरुणांची मागणी होती की, कंपनीने आम्हाला अप्रेंटिसशिप दिलेली आहे परंतु या कॅस्ट्रोल कंपनीसाठी आमची जमीन गेलेली आहे, आम्ही प्रकल्पग्रस्त आहोत आम्हाला कायमस्वरूपी नोकऱ्या दिल्या पाहिजे अशी त्यांची मागणी होती परंतु कंपनी त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत होते.
श्रमिक संघाच्या कामगार नेत्या श्रुती श्याम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली सहा दिवस हे तरुण उपोषणाला बसले होते. सदर उपोषणाला सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा दिला होता. परंतु कॅस्ट्रॉल व्यवस्थापन त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत होते. शेवटी सोमवार, दि. 21 ऑगस्ट 2023 रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर या तीनही तरुणांना कायमस्वरूपी नोकऱ्या दिल्या जातील असं कॅस्ट्रोल कंपनीचे व्यवस्थापन यांच्याकडून सांगण्यात आलेले आहे. त्यानंतर उपोषणकर्ते गोविंद पाटील, जगन्नाथ पाटील व अनंत पाटील यांनी माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते लिंबू सरबत पिऊन उपोषणाची सांगता केली.
तत्पूर्वी कॅस्ट्रोल कंपनीच्या व्यवस्थापना बरोबर झालेल्या दीड तासाच्या चर्चेत माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी अतिशय परखडपणे व अभ्यासपूर्ण प्रकल्पग्रस्त तरुणांची बाजू मांडल्यानंतर प्रशासन वठणीवर आले व कॅस्ट्रोल कंपनीच्या व्यवस्थापनाला या तिन्ही मुलांना नोकरी देण्यास भाग पाडले. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे, कामगार नेत्या श्रुती म्हात्रे, उपतालुकाप्रमुख रमेश पाटील, शिवसेनेचे स्थानिक नेते उत्तमशेठ भोईर, गौरी गडगे, भगवान पाटील, महादेव गडगे, सुनील थोरवे, जगदीश पवार, सागर पाटील, देवेंद्र पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते. सदर उपोषणाच्या वेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघन माळी व पोलीस अधिकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.