प्रशासनाच्या आशीर्वादाने नैसर्गिक प्रवाहात ढवळाढवळ; चिर्ले-दिघोडे परिसरात जनजीवन धोक्यात
उरण | अनंत नारंगीकर
उरण तालुक्यातील चिर्ले-दिघोडे आणि गव्हाण फाटा-चिरनेर या मुख्य रस्त्यालगत खासगी यार्ड मालकांनी निसर्गाचे नियम धाब्यावर बसवून अनधिकृत बांधकाम केले आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महसूल विभागाच्या संगनमताने नैसर्गिक ओढ्याचा प्रवाह बदलण्यात आल्याने, आगामी पावसाळ्यात हे महत्त्वाचे रस्ते पाण्याखाली जाण्याची आणि मोठी जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

प्रशासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष?
मिळालेल्या माहितीनुसार, चिर्ले आणि दिघोडे परिसरातील काही व्यावसायिकांनी चक्क नैसर्गिक मोऱ्यांलगत दगड-मातीचा मोठा भराव टाकून संरक्षक भिंती उभारल्या आहेत. यामुळे पावसाच्या पाण्याचा नैसर्गिक निचरा होणारा मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. उरणचे तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी पदभार स्वीकारल्यापासून तालुक्यात अवैध धंद्यांनी उचल खालली असल्याची टीका स्थानिक स्तरावर होत आहे. वेश्वी, विंधने, चिरनेर, कोप्रोली यांसारख्या ग्रामपंचायत हद्दीत शेती आणि खाडीकिनारे उद्ध्वस्त करून भरावाचे काम जोमाने सुरू आहे.

संभाव्य धोके:
रस्ते जलमय होणे: नैसर्गिक प्रवाह बदलल्यामुळे पावसाळ्यात चिर्ले-दिघोडे रस्ता पूर्णपणे बंद होण्याची शक्यता आहे.
वित्त व जीवितहानी: पाण्याचा वेग प्रचंड असल्याने मानवनिर्मित अडथळ्यांमुळे पूरस्थिती निर्माण होऊन आजूबाजूच्या वस्त्यांना धोका निर्माण होऊ शकतो.
पर्यावरणाचा ऱ्हास: खाडीकिनारे आणि शेतजमिनीत बेसुमार भराव टाकल्याने पर्यावरणाचे न भरून येणारे नुकसान होत आहे.
“पावसाळ्यात उरण तालुक्यात पावसाचा जोर मोठा असतो. खासगी विकासकांनी नियम धाब्यावर बसवून नैसर्गिक ओढ्यात भिंती बांधल्या आहेत. या मानवनिर्मित संकटामुळे जीवितहानी झाल्यास त्याला जबाबदार कोण? आता जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांनी यावर कडक भूमिका घेणे गरजेचे आहे.”
— बी. एम. ठाकूर (सामाजिक कार्यकर्ते)
