श्रीवर्धन । अनिकेत मोहित
सार्वजनिक वाचनालय श्रीवर्धन यांच्या वतीने मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता १० वी व १२ वीच्या परीक्षेत श्रीवर्धन तालुक्यातील विविध शाळा व महाविद्यालयांमधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचा गुणगौरव सोहळा बुधवार दिनांक २० मे २०२६ रोजी वाचनालयाच्या सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या सोहळ्यात इयत्ता १० वी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणारे कु. मिहीर जितेंद्र देशमुख (गोखले स्कूल, श्रीवर्धन), कु. सौम्या किरण सावंत (स्टार ॲकॅडमी हायस्कूल), कु. निष्ठा उमेश चौलकर (वि. गो. लिमये विद्यामंदिर, दिवेआगर), कु. संस्कृती राजकुमार कोलथरकर (हरिहरेश्वर माध्यमिक विद्यालय) तसेच कु. अरिशा तन्वीर चोगले (ए. आर. उंड्रे इंग्लिश स्कूल, रानवली) या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून गौरव करण्यात आला.
कार्यक्रमासाठी महर्षी कर्वे मॉडेल स्कुल श्रीवर्धनचे प्राचार्य दत्तात्रय राणे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना यशासाठी कठोर परिश्रम, सातत्य आणि वाचनाची सवय महत्त्वाची असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून आत्मविश्वासाने पुढे वाटचाल करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाचनालयाचे उपाध्यक्ष विनय वैद्य यांनी केले. तसेच वाचनालयाचे अध्यक्ष मनोज गोगटे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत शिक्षण क्षेत्रात वाचनालयाच्या योगदानाविषयी माहिती दिली.
या कार्यक्रमास वाचनालयाचे कार्यवाह गणेश सावंत, सदस्य डॉ. राजेश तोडकर, पालकवर्ग, वाचनालयाचे सभासद तसेच वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करणारा हा सोहळा प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.
