अमूलकुमार जैन (रायगड)
पेण तालुक्यातील उत्कर्षनगर येथून ६७ वर्षीय ज्येष्ठ नागरिक कोणालाही काहीही न सांगता घरातून बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पेण पोलीस ठाण्यात मिसिंगची (हरवल्याची) नोंद करण्यात आली असून पोलीस आणि कुटुंबीयांकडून त्यांचा कसून शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजगोपाळ श्याम प्रभू (वय ६७, रा. बालाजी ग्रीन सिटी, ई विंग १०१, उत्कर्षनगर, ता. पेण, जि. रायगड) असे बेपत्ता झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. सोमवार, दिनांक १८ मे २०२६ रोजी दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास प्रभू हे घरातून कोणालाही काहीही न सांगता बाहेर पडले. मात्र, उशिरापर्यंत ते घरी न परतल्यामुळे चिंताग्रस्त झालेल्या कुटुंबीयांनी त्यांची सर्वत्र शोधमोहीम सुरू केली. नातेवाईक, मित्रपरिवार आणि आजूबाजूच्या परिसरात शोध घेऊनही त्यांचा कुठेही ठावठिकाणा लागला नाही. अखेर याप्रकरणी त्यांच्या पत्नी गीता राजगोपाळ प्रभू (वय ६५) यांनी २० मे रोजी पेण पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
बेपत्ता व्यक्तीचे वर्णन:
नाव: राजगोपाळ श्याम प्रभू (वय ६७ वर्षे)
शारीरिक वर्णन: रंग गोरा, चेहरा उभट, केस पांढरे, उंची सुमारे ५ फूट ३ इंच.
खाणाखुणा: डोळ्यांवर काळ्या रंगाचा चष्मा आहे.
पेहराव: घरातून बाहेर पडताना अंगात पांढऱ्या रंगाचा निळ्या पट्ट्यांचा शर्ट आणि फुल पॅन्ट परिधान केलेली होती.
वर नमूद केलेल्या वर्णनाची किंवा अशा पेहरावातील कोणतीही व्यक्ती आढळून आल्यास अथवा त्यांच्याबाबत काहीही माहिती मिळाल्यास तातडीने पेण पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक मंगेश धुपकर करीत आहेत.
