• Fri. May 22nd, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

महाडमध्ये पथदिवा बसवताना पोलवरून पडल्याने कंत्राटी वायरमन गंभीर; मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू

ByEditor

May 22, 2026

महाड । मिलिंद माने
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज मार्गावर पथदिवा बसवत असताना महाड नगरपालिकेचा कंत्राटी वायरमन अचानक पोलवरून खाली कोसळून गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (२१ मे) सायंकाळी घडली. जखमी कामगाराला तातडीने मुंबई येथील सैफी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, हा अपघात शॉक लागल्याने झाला की अन्य कारणाने, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज मार्गावरील काही भागातील पथदिवे बंद असल्याने ते दुरुस्त करण्याचे काम पालिकेकडून कंत्राटदार बाळासाहेब हुंडेकर यांच्यामार्फत सुरू होते. गुरुवारी सायंकाळी ४:३० वाजण्याच्या सुमारास कंत्राटी कामगार रोहन राजू बाईत हा पेडणेकर ज्वेलर्स शेजारी असलेल्या एका विद्युत पोलवर पथदिवा बसवत होता. यावेळी अचानक तो पोलवरून खाली कोसळला. या भीषण अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

अपघात घडताच स्थानिक नागरिक आणि सहकाऱ्यांनी त्याला महाडमधील एका खाजगी रुग्णालयात नेले. मात्र, दुखापत अत्यंत गंभीर असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला तातडीने मुंबईच्या सैफी रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या त्याची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

या संदर्भात नगरपालिका अधिकारी रणजीत भोसले यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, “सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. काम सुरू असताना सुरक्षेचा उपाय म्हणून दोन्ही बाजूंचे वीज कनेक्शन बंद करण्यात आले होते. त्यामुळे त्याला शॉक लागून तो खाली कोसळला की अन्य कोणत्या कारणाने, हे तो शुद्धीवर आल्यानंतरच स्पष्ट होऊ शकेल.”

पालिकेकडून मुख्य वीज पुरवठा खंडित करण्यात आला असला, तरी स्थानिक नागरिकांमध्ये वेगळीच चर्चा सुरू आहे. घटनास्थळाजवळील एका ज्वेलर्सच्या दुकानाचे जनरेटर सुरू होते, त्याचा ‘उलटा विद्युत प्रवाह’ (बॅक फीड) संबंधित पोलवर उतरल्यामुळेच रोहनला जोरदार शॉक लागला आणि तो खाली कोसळला, अशी चर्चा घटनास्थळी ऐकायला मिळत होती.

सदर घटनेमुळे पालिकेच्या कंत्राटी कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, पोलीस आणि संबंधित विभाग या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!