• Fri. May 29th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

जुने मीटर काढून स्मार्ट मीटर लावल्याने जाब विचारणाऱ्या आदिवासी बांधवास व सरपंचाला जातीवाचक शिवीगाळ!

ByEditor

May 29, 2026

जांभूळपाडा महावितरणच्या मुजोर अधिकाऱ्यांचा प्रताप; पाली पोलिसांत ‘ॲट्रॉसिटी’ अंतर्गत कारवाईसाठी निवेदन

कोलाड । विश्वास निकम
राज्यात एकीकडे “ग्राहकांच्या परवानगीशिवाय स्मार्ट मीटर बसवू नका” असे आदेश मुख्यमंत्री देत असताना, दुसरीकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून या आदेशांची सर्रास पायमल्ली होत असल्याचे चित्र समोर आले आहे. सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी पेडली येथील एका घरात जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवल्याने जाब विचारण्यासाठी गेलेल्या आदिवासी कातकरी समाजाच्या व्यक्तीला आणि त्यांच्या सरपंच पुत्राला सार्वजनिक ठिकाणी जातीवाचक शिवीगाळ करत दमदाटी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या मुजोर अधिकाऱ्यांवर अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधात्मक कायद्यानुसार (ॲट्रॉसिटी ॲक्ट) गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी पीडित राम पवार यांनी पाली पोलीस ठाण्यात तक्रारवजा निवेदन दिले आहे.

नक्की काय घडले?

पेडली येथील रहिवासी राम पवार यांचे सुपुत्र दिनेश पवार हे ग्रुप ग्रामपंचायत तिवरे येथे गेल्या तीन वर्षांपासून सरपंच म्हणून कार्यरत आहेत. २७ मे रोजी संध्याकाळी महावितरणचे वायरमन राम पवार यांच्या घरी आले आणि कोणतीही पूर्वकल्पना किंवा लेखी नोटीस न देता जुने मीटर काढून नवीन स्मार्ट मीटर बसवू लागले. घरच्या महिलांनी विरोध केला असता वायरमननी शासनाचे आदेश असल्याचे सांगत त्यांचे काहीही ऐकले नाही.

यानंतर राम पवार आणि त्यांचे सरपंच पुत्र दिनेश पवार यांनी भालगुल फाटा येथील भवानी स्टील दुकानाजवळ महावितरणच्या कर्मचाऱ्यांना गाठले. तेथे हजर असलेले महावितरणचे उपअभियंता चात्रे आणि सहाय्यक अभियंता भंडारी यांच्यासह कोणत्याही कर्मचाऱ्याच्या गळ्यात ओळखपत्र नव्हते. जुने मीटर काढण्याबाबत कायदेशीर तरतूद किंवा शासनाचा जी.आर. (GR) मागितला असता, उपअभियंता चात्रे यांना प्रचंड राग आला. त्यांनी सार्वजनिक ठिकाणी “तुम्ही कातकरी आहात, तुम्हाला चार गोष्टी कळत नाहीत. आम्हाला हे कातकरी अक्कल शिकवतात, यांना चांगलाच बांबू लावायला पाहिजे” असे जातीवाचक आणि अपमानास्पद उद्गार काढले.

गाडीत डांबून नेण्याचा प्रयत्न आणि दमदाटी

एवढ्यावरच न थांबता, राम पवार यांना मारहाण करण्याच्या उद्देशाने महावितरणच्या अधिकाऱ्यांनी त्यांना जबरदस्तीने एका वॅगनआर गाडीत (क्रमांक MH 46 WD 2176) दोघा वायरमनच्या मध्ये बसवून पेडली येथील महावीर मंदिरासमोर नेले. तेथे सरपंच दिनेश पवार यांनी पुन्हा एकदा कायदेशीर तरतुदींचा जाब विचारला असता, सहाय्यक अभियंता भंडारी यांनी “तुला कायद्याचे ज्ञान आहे का? तुला सरपंच कोणी केले?” असे म्हणत हुज्जत घालून अरेरावी केली. अखेर ग्रामस्थ गोळा झाल्यावर चात्रे यांनी फोन करून वायरमनना नवीन स्मार्ट मीटर काढून पुन्हा जुनेच मीटर लावण्याचे आदेश दिले आणि तिथून पळ काढला.

पोलिसांत धाव आणि आंदोलनाचा इशारा

या मुजोर आणि जातीवादी वर्तणुकीमुळे संतप्त झालेल्या आदिवासी समाज बांधवांनी पाली पोलीस ठाणे गाठून दोन्ही अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली. यावेळी पाली पोलीस ठाण्याच्या सपोनि हेमलता शेरेकर आणि डीवायएसपी प्रसाद गोकुळे उपस्थित होते. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन डीवायएसपी प्रसाद गोकुळे यांनी दिले आहे. हे निवेदन नवी दिल्ली येथील जनजातीय आयोग आणि रायगड जिल्हा एकलव्य आदिवासी संघटनेलाही पाठवण्यात आले आहे.

“एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री सांगतात की ग्राहकांच्या परवानगीशिवाय स्मार्ट मीटर बसवू नये, मात्र महावितरणचे अधिकारी या सूचनेचे पालन न करता मुजोरी करत आहेत. जांभूळपाडा महावितरणच्या या उर्मट अधिकाऱ्यांवर ‘ॲट्रॉसिटी ॲक्ट’नुसार तात्काळ गुन्हा दाखल न झाल्यास रायगड जिल्हा एकलव्य आदिवासी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.” – भिवा पवार (जिल्हाध्यक्ष, एकलव्य आदिवासी संघटना, रायगड)

निवेदन देतेवेळी एकलव्य संघटनेचे उपाध्यक्ष विश्वास भोई, सल्लागार कृष्णा वाघमारे, आदिवासी नेते भिमाजी पवार, बाळू पवार, तिवरे ग्रामपंचायतीचे सरपंच दिनेश पवार, सुशील पवार, राम कोळी यांच्यासह आदिवासी कातकरी समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या घटनेमुळे महावितरण कंपनीने ‘विद्युत कायदा २००३’ आणि ‘विद्युत अधिनियम २०२०’ मधील तरतुदींचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट होत असून, सर्वसामान्य जनतेतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!