गाड्यांची अवस्था बिकट तर कर्मचार्यांची सुरक्षा वार्यावर
घनःश्याम कडू
उरण : उरण नगरपालिकेच्यावतीने शहरातील कचरा गोळा करण्याचा ठेका देण्यात आला आहे. सदर ठेकेदार हा नगरपालिकेला चुना लावत आपल्या मनमानी प्रमाणे कचरा गोळा करीत आहे. याबाबत आरोग्य विभागाचे निरीक्षक हरेश तेजी यांच्याकडे गेली अनेक महिन्यापासून माहिती विचारूनही ते देण्यास टाळाटाळ करीत आहेत. कचरा गोळा करणार्या कर्मचार्यांची सुरक्षा वार्यावर तर गाड्यांची अवस्था बिकट असुन त्यांचे कोणतेही पेपर नसल्याचे दिसते. यामुळे ठेकेदारच दे धक्का असल्याची चर्चा उरणच्या जनतेत सुरू आहे.

उरण नगरपालिकेच्यावतीने घनकचर्याचा ठेका खासगी ठेकेदाराला दिला आहे. परंतु ठेकेदार दिलेल्या नियमानुसार कचरा गोळा न करता नियमांची पायमल्ली करीत असल्याच्या जनतेच्या तक्रारी आहेत. याबाबत आरोग्य विभागाचे निरीक्षक हरेश तेजी यांच्याकडे पत्रकार, सामाजिक संघटना व स्थानिक जनतेने अनेक वेळा तक्रारी करूनही ते कोणत्याही प्रकारची दखल घेताना दिसत नाहीत. उलट ठेकेदार व अधिकारी तेजी यांची गट्टी असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. पत्रकारांनी घनकचरा ठेका कोणाला दिलाय व कितीचा ठेका आहे याची माहिती मिळावी. त्यासाठी गाड्यांची तरदुत किती करण्यात आली आहे. त्या गाड्यांची अवस्था कशी आहे. तसेच त्यांची पासिंग व पियुसी, आरसी बुक, इन्शुरन्स केली आहेत का? तसेच ठेकेदार घनकचरा ठेक्याप्रमाणे घरोघरी कचरा गोळा न करता रत्यावरील कचराच गोळा करून मोकळा होत आहे. यावर माहिती मिळावी अशी मागणी गेली अनेक महिन्यापासून करूनही ते कोणतीही माहिती देत नाहीत.
कचर्याच्या गाड्यांची बिकट अवस्था असून त्यातील काही बंद आहेत. त्यामुळे टॅक्टरमध्ये घनकचरा घरोघरी न जाता रस्त्यावरीलच गोळा केला जातो. कचरा गोळा करणार्या गाड्यांच्या नंबर प्लेट गायब आहेत. त्यांची पासिंग, इन्शुरन्स, आरसी बुक, पियुसी केली नसल्याची धक्कादायक माहिती कचरा गोळा करणार्या वाहनचालकांनीच दिली. काही कचरा भरलेल्या गाड्यांना धक्का मारावा लागत आहे, तर काही गाड्या नगरपालिका आवारात बंद अवस्थेत पडल्या आहेत. तसेच कचरा गोळा करणार्या कामगारांना साहित्य तसेच त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जी सोयीसुविधा देणे आवश्यक असताना दिली जात नाही. तसेच नियमानुसार वेतन देण्यामध्येही तफावत जाणवत आहे. तसेच ठेकेदाराच्या माणसांकडे याची विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देऊन तुम्हांला काय करावयचे ते करा असे सांगतात. त्यामुळे या सर्व कचर्याच्या ठेक्यामध्ये मोठ्या प्रमाणात गौडबंगाल असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर नियमानुसार ठेकेदार कचरा गोळा करण्याचे काम करीत असते तर आरोग्य निरीक्षक हरेश तेजी यांनी माहिती उपलब्ध करून दिली असती.