उरण । विठ्ठल ममताबादे
उरण ते मोरा रोडवरील हरिश्चंद्र गावंड उद्यानासमोर रविवारी पहाटेच्या सुमारास दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात इतका भयानक होता की, दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आणि उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे उरण परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत असून, या गतिमान रस्त्यावर तात्काळ गतिरोधक बसवण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
बेदरकार वेगाने घेतला दोघांचा बळी
उरण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, १ जून २०२६ रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. मोरा बाजून उरणकडे सीबी शाईन मोटारसायकल (क्र. MH-46-BU-0421) वरून महेश प्रल्हाद चांदेकर (वय ३५, रा. बोरी मागिरदेव परिसर, डोंगरआळी, उरण) हा येत होता. याच वेळी उरणकडून मोराच्या दिशेने बुलेट मोटारसायकल (क्र. MH-03-DP-1948) वरून निखील दिपक कुकडे (वय ३८, रा. शिवसागर अपार्टमेंट, नागाव पोलीस लाईनसमोर, नागाव रोड, उरण) हा जात होता.
हरिश्चंद्र गावंड उद्यानासमोर दोन्ही चालकांनी आपल्या ताब्यातील वाहने बेदरकारपणे व भरधाव वेगाने चालवून रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केले आणि दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली.
अपघातानंतर दोन्ही तरुण गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर कोसळले होते. घटनेची माहिती मिळताच उरण पोलिसांनी तात्काळ धाव घेत दोघांनाही रुग्णालयात दाखल केले. मात्र, पहाटे ३:४० आणि ३:४५ वाजता डॉक्टरांनी त्यांना तपासून उपचारापूर्वीच मृत घोषित केले.
या प्रकरणी वैभव यशवंत कडू यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उरण पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. १६६/२०२६ नुसार बीएनएस कलम १०६(१), १२५(ब), २८१ तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातस्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) स्वप्नील केदार यांनी भेट देऊन पंचनामा केला असून, या प्रकरणाचा पुढील प्राथमिक तपास ते करत आहेत. १ जून रोजी सकाळी ७:३७ वाजता या गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
गतिरोधक बसवण्याची मागणी तीव्र
या अपघातामुळे उरण-मोरा रोडवरील वाढत्या वाहनवेगाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. हरिश्चंद्र गावंड उद्यानासमोर वाहनांचा वेग मर्यादित ठेवण्यासाठी प्रशासनाने तातडीने गतिरोधक (स्पीड ब्रेकर्स) आणि आवश्यक ते फलक लावावेत, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून केली जात आहे.
