श्रीवर्धन । अनिकेत मोहित
गालसुरे गावाजवळील मुख्य रस्त्यालगत असलेल्या नाल्याला पडलेल्या मोठ्या आणि उघड्या भगदाडामुळे एका दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातामुळे स्थानिक नागरिकांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक प्रशासनाविरोधात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. रस्त्यांच्या दुरवस्थेकडे आणि प्रवाशांच्या सुरक्षेकडे संबंधित प्रशासन किती गंभीरतेने डोळेझाक करत आहे, याचे हे आणखी एक जिवंत उदाहरण असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एक दुचाकीस्वार या मार्गावरून प्रवास करत असताना रस्त्यालगतच्या नाल्याला पडलेल्या धोकादायक भगदाडात त्याची दुचाकी थेट आदळली. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की, दुचाकीच्या समोरील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. गाडीचे हेडलाईट, इंडिकेटर्स, हँडलसह अनेक भाग पूर्णपणे तुटून रस्त्यावर विखुरले गेले. या अपघातात वाहनचालक गंभीर जखमी झाल्याचे समजते.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या कारभाराचे वाभाडे काढत या अपघाताला थेट संबंधित विभागाचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा आरोप केला आहे. रस्त्याच्या अगदी कडेला एवढे मोठे भगदाड पडूनही ते दुरुस्त करण्याची तसदी प्रशासनाने घेतलेली नाही. विशेष म्हणजे, तेथे कोणतेही इशारा फलक, रिफ्लेक्टर्स, बॅरिकेड्स किंवा सुरक्षाव्यवस्था उभारण्यात आलेली नाही. रात्रीच्या वेळी या परिसरात पुरेशी प्रकाशव्यवस्था (स्ट्रीट लाईट्स) नसल्याने समोरून येणाऱ्या वाहनांच्या प्रखर प्रकाशामुळे वाहनचालकांना हे भगदाड दिसत नाही आणि वाहने थेट यात कोसळतात.
पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
हा मार्ग श्रीवर्धन ते हरिहरेश्वर या पर्यटनदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या मार्गांपैकी एक आहे. शनिवार-रविवार आणि सुट्ट्यांच्या काळात या रस्त्यावर पर्यटकांच्या शेकडो दुचाकी आणि चारचाकी वाहनांची मोठी वर्दळ असते. बाहेरील भागातून येणाऱ्या पर्यटकांना या रस्त्यावरील भगदाडाचा अंदाज येत नाही. त्यामुळे हे भगदाड सध्या केवळ स्थानिकांसाठीच नव्हे तर पर्यटकांसाठीही ‘मौत का कुआँ’ ठरत आहे.
“प्रशासनाला जाग येण्यासाठी आणखी किती अपघात व्हावे लागतील आणि किती निष्पाप नागरिकांचे बळी जावे लागतील?” असा संतप्त सवाल स्थानिक ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. अनेक दिवसांपासून हा धोका कायम असतानाही संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.
दरम्यान, या घटनेची गंभीर दखल घेत हे भगदाड युद्धपातळीवर बुजवण्यात यावे आणि त्या ठिकाणी मजबूत संरक्षक भिंत, रेलिंग किंवा बॅरिकेड्स उभारण्यात यावेत, अशी जोरदार मागणी होत आहे. प्रशासनाने तातडीने पावले न उचलल्यास भविष्यात यापेक्षाही मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
