शोधलेल्या मोबाईलची किंमत सुमारे ४ लाख रुपये; नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक
सलीम शेख | माणगाव
सर्वसामान्य नागरिकांचे गहाळ अथवा चोरीस गेलेले मोबाईल फोन शोधून देण्यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेल्या ‘CEIR’ (Central Equipment Identity Register) पोर्टलचा प्रभावी वापर करत माणगाव पोलीस ठाण्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पोलिसांनी अथक प्रयत्नांनंतर शोधून काढलेले १५ मोबाईल फोन आज कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मूळ मालकांना परत केले.
माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस अंमलदार सुग्रीव उद्धवराव मुंडे यांनी मागील अवघ्या एक महिन्याच्या कालावधीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ही कामगिरी केली. हस्तगत करण्यात आलेल्या या १५ मोबाईल फोनची एकूण अंदाजित किंमत सुमारे ४ लाख रुपये आहे.
तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोध
मोबाईल गहाळ झाल्याबाबत माणगाव पोलीस ठाण्यात प्राप्त झालेल्या तक्रारींची पोलिसांनी सखोल पडताळणी केली. त्यानंतर ‘CEIR’ पोर्टलवर संबंधित मोबाईलचे आयएमईआय (IMEI) क्रमांक नोंदवून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्यांचा माग काढण्यात आला. पोलिसांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे विविध ठिकाणांहून हे सर्व मोबाईल जप्त करण्यात पोलिसांना यश आले.
नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण
आपले हरवलेले महागडे मोबाईल फोन पुन्हा सुस्थितीत मिळाल्याने तक्रारदारांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. “हरवलेला मोबाईल परत मिळणे ही केवळ वस्तू मिळण्यापुरती मर्यादित बाब नसून, यामुळे सर्वसामान्यांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे,” अशी भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केली.
तक्रारदारांनी माणगाव पोलीस ठाण्यासह पोलीस निरीक्षक संजय बांगर आणि पोलीस अंमलदार सुग्रीव मुंडे यांचे मनःपूर्वक आभार मानले. आधुनिक तंत्रज्ञानाचा असाच प्रभावी वापर करून नागरिकांना दिलासा देण्याचे काम माणगाव पोलिसांकडून सातत्याने सुरू राहील, असा विश्वास पोलीस प्रशासनाने यावेळी व्यक्त केला.
